तळे जांभुळवाडी शाळेची शैक्षणिक भरारी; ‘मंथन’ परीक्षेत १००% निकालासह विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

खेड (प्रतिनिधी):
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळे जांभुळवाडी ही शाळा शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने आपली गुणवत्ता सिद्ध करत असून यंदाही ‘मंथन सामान्य ज्ञान परीक्षा २०२६’ मध्ये शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय गुण मिळवले. इयत्ता चौथीतील कु. पुष्कर अंकुश निकम आणि कु. सिद्धी संतोष जोशी यांनी प्रत्येकी २४४ गुण मिळवत विशेष प्राविण्य संपादन केले, तर कु. धनश्री विकेश महादे हिने २४० गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. इयत्ता तिसरीतील कु. निशा अंकुश निकम हिने १६० गुण मिळवले असून इयत्ता पहिलीतील कु. मिहीर मिलिंद लव्हाळे याने १५० पैकी १०६ गुण मिळवत उज्ज्वल कामगिरी नोंदवली आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ही शाळा केवळ शैक्षणिक निकालापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरही भर देत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत शाळेत डिजिटल क्लासरूम, ई-लर्निंग सुविधा तसेच एआय आधारित कॉम्प्युटर लॅब उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृतीतून शिक्षण, नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्नशील आहेत.
या यशाबद्दल केंद्रप्रमुख श्री. सु. रा. पवार, मुख्याध्यापक श्री. रवींद्र हरिश्चंद्र इटकर, मार्गदर्शक शिक्षक श्री. निलेश सखाराम कांदेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. सायली संतोष जोशी आणि अध्यक्ष श्री. विकेश राजाराम महादे यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच ग्रामस्थ मंडळ तळे जांभुळवाडी यांनीही या यशाचे स्वागत करत शाळेच्या कार्याचा गौरव केला आहे.
शाळेच्या या सातत्यपूर्ण यशामुळे परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली असून शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत शाळेने उंचावलेले मानदंड इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.