ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशीराम कदम गुरुजी यांचा संस्थेच्या वतीने विशेष सन्मान!
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती (रजि.) चिपळूण /मुंबई आणि तालुका धम्म कमिटी यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या चार महिन्यांच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास कार्यक्रम मालिकेचा आज चिपळूण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात प्रारंभ करण्यात आला.
चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या वतीने गेल्या ४५ वर्षांपासून वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने केले जात आहे. आषाढ पौर्णिमेला गुरुवारी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात वर्षावास मालिकेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्व बौद्धाचार्य आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ बौद्धाचार्य प्रभाकर सकपाळ, मनोहर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध वंदना, पूजापाठ, सूत्रपठण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत व धम्म कमिटीचे अध्यक्ष मनोहर कदम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात संस्थेच्या सावर्डे विभागाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशीराम कदम गुरुजी (खेरशेत) यांच्या शैक्षणिक, सामाजिक योगदानाबद्दल गुरुपौर्णिमेच्या तथा आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंचा सन्मान म्हणून संस्थेच्या वतीने विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला. कदम गुरुजी यांना सन्मानपत्र देऊन अध्यक्षांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच चिपळूण शाखेतील सुधाकर मोहिते यांना नव्याने बौद्धाचार्याची सनद सुपूर्द करण्यात आली. तसेच आमदार शेखर निकम सर यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र कदम यांचा देखील संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना काशीराम कदम गुरुजी यांनी संस्थेच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपण सातत्याने काम करीत राहिले पाहिजे असे सर्वांना आवाहन केले. आपली वैचारिक भूमिका ठाम ठेवून काम केल्यास आपल्याला निश्चितपणे यश मिळते असे सांगितले.
तद्नंतर आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने वर्षावासात चर्चा करण्यात आली. यामध्ये बौद्धाचार्य सुभाष सावंत, जगदीश कांबळे गुरुजी, प्रभाकर सपकाळ, मनोहर कदम आदींनी आपले विचार मांडले. विविध प्रकारचे प्रश्न चर्चेसाठी सर्वांसमोर ठेवले. शेवटी अध्यक्ष भाषणात चंद्रकांत सावंत यांनी विविध मुद्यांवर आपली मते व्यक्त केली. येणाऱ्या चार महिन्याच्या वर्षावासात बौद्ध धम्मातील विविध पद्धती, संस्कृती, धम्म संस्कार पद्धती याबद्दल सविस्तरपणे चर्चा घडवून आणली जाईल असे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्थेचे सरचिटणीस संदेश पवार यांनी मानले. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष बुद्धघोष गमरे, सहचिटणीस तुकाराम सकपाळ, प्रमोद कांबळे , शिक्षण कमिटीचे अध्यक्ष विलास सकपाळ गुरुजी, न्यायदान कमिटीचे अध्यक्ष आनंद सकपाळ, धम्म कमिटीचे चिटणीस सतीश जाधव, तसेच अतुल कदम, सुनील गमरे, संजय मोहिते गुरुजी, दिलीप मोहिते, राकेश जाधव, नारायण जाधव, संतोष पवार, विक्रांत पवार, विलास गमरे गुरुजी, सुधाकर पवार, दिवाकर जाधव, माजी चिटणीस रमाकांत सकपाळ, बौद्धाचार्य संजय सावंत, शरद मोहिते, राजेंद्र जाधव, बाबुराव कांबळे, सुभाष सावंत, प्रताप मोहिते, प्रभाकर मोहिते, अनंत पवार, निरंजन कांबळे, सुधाकर मोहिते, विष्णू जाधव, जयसिंग सावंत, तुषार गमरे, प्रकाश सावंत, एस. के. जाधव, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.








