रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी जो.रूबेन सन परदेशी याची महाराष्ट्र प्रिमिअर लीगच्या क्रिकेट संघात निवड.

खेड – ( प्रतिनिधी )
दिनांक – 11 जुलै 2025

भारतातील नंबर वनची प्रादेशिक स्पर्धा समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र प्रिमिअर लीग स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडचा माजी विद्यार्थी जो.रूबेन सन परदेशी याची निवड झाली असून त्याला रत्नागिरी जेट्स या संघाकडून खेळण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.

रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी असलेला जो.रूबेन सन परदेशी याचे नर्सरी ते इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण रोटरी स्कूलमध्ये झाले असून बालपणापासून त्याला क्रिकेट खेळण्याची आवड होती. त्याची क्रिकेटमधील आवड पाहून शाळेकडूनही त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असे. दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध खेळाडू ए. बी. डिव्हिलियर्स हा त्याचा आदर्श खेळाडू असून त्याच्याप्रमाणे क्रिकेट खेळण्याचे त्याचे स्वप्न आहे.

महाराष्ट्र प्रिमिअर लीग स्पर्धेमध्ये निवड होण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन महाटीम 20 स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे संघ व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त क्लब सहभागी होतात. यामधून रत्नागिरीच्या संघामध्ये जो रुबेन सन परदेशी याला आपले नशीब आजमावण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. त्याने पुणे संघाविरूद्ध उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून निवड समिती व टीम फ्रेंच्याजी ह्यांचे लक्ष आपल्या कडे वळवले व महाराष्ट्र प्रीमिअर लीगच्या ऑक्शनसाठी जागा मिळवली.

महाराष्ट्र प्रीमिअर लीग ही भारतातील नंबर १ ची प्रादेशिक स्पर्धा असून पुणेरी बाप्पा, रत्नागिरी जेट्स, कोल्हापूर टास्कर्स, नाशिक इगल्स टायटन, सातारा वाॅरिअर या संघांचा त्यात समावेश आहे. यातील प्रत्येक संघ हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून करोडो रुपयाला फ्रेंच्यायजी विकत घेतलेला आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या नावाने खेळणाऱ्या या स्पर्धेत रत्नागिरी जेट्स या संघाकडून जो.रूबेन सन परदेशी याला खेळण्याची संधी मिळाली आहे. स्टार स्पोर्ट्स 2 आणि जिओ हॉटस्टार वर लाईव्ह टेलिकास्ट केली जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये आपणाला जो. रुबेन सन परदेशी याला पाहण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धे मधून बी. सी. सी. आय. च्या आय. पी. एल, रनजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी अशा स्पर्धेमध्ये निवड होत असल्याने जो.रूबेन सन परदेशी हा खूप मेहनत घेत आहे.

रोटरी स्कूलचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जो.रूबेन सन परदेशी याचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.