रत्नागिरी :
महाराष्ट्र विधानसभेत नुकतेच ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक’ बहुमताने मंजूर झाले असून, हा कायदा देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे. संविधानविरोधी माओवादी चळवळी, नक्षलवादी आणि अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या शक्तींवर प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सदर विधेयक चर्चेनंतर विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांमध्ये यापूर्वीच अशा स्वरूपाचा कायदा अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात मात्र, डाव्या विचारसरणीच्या 64 संघटना कार्यरत असून त्यापैकी काही संघटना इतर राज्यांमध्ये प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात मात्र अशा स्वरूपाचा स्वतंत्र कायदा नसल्याने अनेक वेळा कारवाई करताना पोलिस प्रशासनाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत होता.
“हा कायदा नक्षलवादी, माओवादी व अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या विचारसरणींवर कारवाई करण्यासाठी उपयुक्त ठरेल. शहरी नक्षलवाद आणि महाविद्यालयांमधील कडव्या डाव्या विचारांच्या प्रसारावरही आळा घालण्यासाठी कायदा नक्कीच प्रभावी ठरणार आहे. या कायद्याची लवकरात लवकर महाराष्ट्रभर प्रभावी अंमलबजावणी करावी,” असे मत अभाविप कोंकण प्रांत मंत्री राहुल राजोरिआ यांनी मांडले आहे.









