चिपळूण (प्रतिनिधी) : साहित्य भारती कोकण प्रांताच्या चिपळूण शाखेच्या वतीने युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिपूर्वक साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला एल.आय.सी. अधिकारी, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या संचालक व योगगुरू श्रीमती मनिषा दामले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “भारतीय संस्कृती ही वैभवशाली असून, गुरू-शिष्य परंपरा हे तिचं मोलाचं वैभव आहे. निसर्गालाही गुरु मानणं ही आपल्या संस्कृतीची खासीयत आहे,” असे त्या म्हणाल्या. शिक्षण घेताना शालेय गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि आयुष्यात पुढे अनेक टप्प्यांवर भेटणाऱ्या गुरूंना देखील मान द्यावा, असा संदेश त्यांनी दिला.
दत्तगुरूंच्या २४ गुरूंचा उल्लेख करत त्यांनी आकाश, मधमाशी, वारा यांसारख्या निसर्ग घटकांकडून शिकण्याच्या उदाहरणांद्वारे मुलांना गुरुतत्त्वाचे महत्त्व समजावून सांगितले. “ग्रंथ हे देखील गुरूच आहेत. ते वाचा, समजून घ्या, तेच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात,” असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय साहित्य भारती कोकण प्रांताच्या चिपळूण शाखेच्या अध्यक्षा सौ. प्राची जोशी यांनी सादर केला. शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. रेवती कारदगे, मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, सौ. वैशाली चितळे, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









