दापोली l प्रतिनिधी- गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी दापोली आगार सज्ज झाले असून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी जादा बसेसच्या संगणकीय आरक्षणाला दि. 11 जुलै पासून प्रारंभ होत असल्याची माहिती आगारप्रमुख श्री. राजेंद्र उबाळे यांनी दिली आहे.
दापोली आगारातून मुंबई, बोरीवली, नालासोपारा, ठाणे, भाईंदर, विठ्ठलवाडी, पुणे या मार्गावर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी नेहमीच्या बसेस व्यतिरिक्त जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एसटीच्या प्रवाशांना सुखकर व सुरक्षित प्रवास करण्यासाठी सर्व चालक -वाहक, यांत्रिकी कर्मचारी व अधिकारी वर्ग सदैव तत्पर असतो. एसटीच्या प्रवासामध्ये 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, 65 वर्षावरील व महिला प्रवाशांना 50 टक्के दरात प्रवास या सुविधा उपलब्ध असून मागणीनुसार दापोली तालुक्यातील विविध गावातून 42 प्रवासी उपलब्ध झाल्यास गु्रप बुकींग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी संगणकीय आरक्षण करून एसटीने प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












