इन्सुलीत ट्रक चालकाचा आकस्मिक मृत्यू

बांदा : प्रतिनिधी

इन्सुली येथे धाब्यावर थांबविण्यात आलेल्या अवजड वाहतुकीतील ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. रवींदर सदबीर (३७, रा. हरियाणा) असे मृताचे नाव आहे. प्रथमदर्शनी त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा असा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. मृत्यूचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

 

रवींदर हा एका खासगी कंपनीचा माल घेऊन ट्रकद्वारे वाहतूक करत होते. सोमवारी इन्सुली येथील ढाब्यावर ट्रक थांबविला होता. त्यावेळी ट्रकमध्ये ते अत्यवस्थ अवस्थेत असल्याचे ढाब्यावर काम करणाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधून बांदा पोलीस ठाण्यात माहिती दिली.

 

बांदा पोलिस कर्मचारी बी. बी. पालकर व होमगार्ड प्रवीण परब यांनी घटनास्थळी धाव घेत रवींदर यांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

 

बांदा पोलिसांनी त्यांच्या हरियाणातील नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईक बांदा येथे आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक पाहणीत रवींदर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद बांदा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी नरेश कुडतरकर करीत आहेत.