रविवारी सिंधुदुर्गसह कोल्हापूर, रत्नागिरीतील हजारो पर्यटक धबधब्यावर
वैभववाडी l प्रतिनिधी : काचेच्या पुलामुळे नापणे धबधब्यावरील वर्षा पर्यटन बहरले आहे. रविवारी दिवसभरात नापणेत हजारो पर्यटक दाखल झाले आहेत. सिंधुदुर्गसह रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटक धबधब्यावर मनमुराद आनंद लुटण्यासाठी आले होते. सद्यस्थितीत पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे नदीला पाण्याचा प्रवाह मोठा आहे. पर्यटकांनी खोल पाण्यात अंघोळीसाठी उतरू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
वैभववाडी तालुक्यातील बारमाही वाहणाऱ्या नापणे धबधब्यावर काचेचा पूल उभारण्यात आला आहे. धबधब्यावर उभारण्यात आलेला काचेचा पूल हा राज्यातील पहिला पूल आहे. हा पूल पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. खास काचेचा पूल पाहण्यासाठी नापणे धबधब्यावर पर्यटकांची रीघ लागली आहे. गगनबावडा – तरळे या राष्ट्रीय महामार्गापासून नापणे धबधबा हा तीन ते चार किमी अंतरावर आहे. धबधब्यावर काचेचा पूल उभारण्यात आल्याची माहिती संपुर्ण राज्यात सोशल मीडियाच्याद्वारे पोहचली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांची पावले नापण्याकडे वळू लागली आहेत. नापणे धबधब्यावर खाजगी मालकीची दोन ते तीन छोटी हॉटेल आहेत. परंतु ती सद्यस्थितीत बंद अवस्थेत आहेत. त्या ठिकाणी सद्यस्थितीत एकही टपरी, दुकान व हॉटेल चालू नाही. त्यामुळे पर्यटकांचे गैरसोय होत आहे. तसेच चेंजींग रुम, स्वच्छतागृह व सुलभ शौचालय नसल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे.
वैभववाडी तालुक्यातील हे महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. नाधवडे येथील उमाळा म्हणजे निसर्गाची अद्भुत शक्ती आहे. या उमाळ्याचे पाणी गोठना नदीतून नापणे धबधब्याकडे जाते. त्यामुळे नापणे धबधबा बारमाही वाहणारा धबधबा आहे. पावसाळ्यापेक्षा या पर्यटन स्थळाला उन्हाळ्यात अनेक पर्यटक भेटी देतात. मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर हा काचेचा पूल उभारण्यात आला आहे. रविवारी दिवसभर हजारो पर्यटक नापणे धबधब्याकडे आले होते. पर्यटकांना आकर्षित करणा-या या काचेच्या पुलामुळे रोजगार निश्चित वाढणार आहे. याचा चांगला फायदा स्थानिक व्यावसायिकांना होणार आहे.











