ओळखीच्या व्यक्तींचे फोटो अश्लील साइटवर टाकून ब्लॅकमेल
आर्थिक वादातून उघडकीस आले गंभीर सायबर गुन्हे प्रकरण
पुण्यातील रावेत परिसरात सायबर गुन्ह्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका प्लेसमेंट एजन्सीतील कर्मचाऱ्याने ओळखीच्या व्यक्तींचे फोटो मॉर्फ करून अश्लील वेबसाइटवर टाकले. त्यानंतर संबंधितांकडून हे फोटो हटवण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. प्राथमिक तपासात हा प्रकार आर्थिक वादातून घडल्याचे समोर आले आहे.
पुणे : रावेत पोलिसांनी रविवारी हिंजवडी येथील एका प्लेसमेंट एजन्सीतील कर्मचाऱ्याला अटक केली आहे. ओळखीच्या व्यक्तीच्या मंगेतर आणि आईचे फोटो मॉर्फ करून ते अनेक अश्लील वेबसाइटवर अपलोड केल्याचा आणि सामग्री हटवण्यासाठी ५ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांसह भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८ (खंडणी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेत पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक नितीन फटांगरे यांनी प्रहार डिजिटलशी बोलताना सांगितले की, प्राथमिक तपासात ही घटना तक्रारदार आणि आरोपी यांच्यातील आर्थिक वादातून घडल्याचे स्पष्ट होत आहे. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये आक्षेपार्ह मजकूर आढळून आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार एकमेकांच्या ओळखीचे होते आणि त्यांच्यात पैशांवरून वाद सुरू होता. या वादानंतर आरोपीने तक्रारदाराच्या मंगेतर आणि आईचे फोटो एडिट करून ते अश्लील वेबसाइटवर अपलोड केले. तसेच हे फोटो तक्रारदार, त्याची मंगेतर आणि मित्रपरिवारालाही पाठवले.
यानंतर आरोपीने तक्रारदाराला फोन करून फोटो हटवण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आणि पुढील तपास सुरू केला आहे.











