फासेपारधी टोळीतील दोघांना बेंगलोर येथून सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतले ताब्यात.

सावंतवाडी घरफोडी, मोटर सायकल चोरी, गोव्यातील गुन्ह्यांमधील वॉन्टेड आरोपी पकडले.

सिंधुनगरी प्रतिनिधी

गोवा आणि त्यानंतर सिंधुदुर्ग या ठिकाणी घरफोडी करणाऱ्या, मोटर सायकल चोरी करणाऱ्या सोलापूर मोहोळ येथील फासेपारधी टोळीतील शंकर मधुकर पवार उर्फ हाड्या (२५)व राजू मधुकर पवार उर्फ गुड्या(२७) या दोघांना सिंधुदुर्ग पोलिसांनी बेंगलोर येथे ताब्यात घेतले. राज्य व परराज्यात अनेक गुन्हे नोंद असणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोस सुराग नसताना सिंधुदुर्ग च्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने पकडल्याबद्दल सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यानी पत्रकार परिषदेत या पोलीस टीमचे कौतुक केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम उपस्थित होत्या. दरम्यान न्यायालयाने या दोघा संशयित आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

फासेपारधी टोळी चोऱ्या घरफोड्या करत असताना ते दहशत निर्माण करतात. पाळ कोयत्या सारखी हत्यारे वापरून हिस्त्रपणे हल्ला करतात. अशी त्यांची पद्धत असल्याने या संशयित आरोपींचा शोध घेणे जिल्हा पोलिसांना आव्हान होते. ८ जुलै रोजी सावंतवाडी परिसरात झालेल्या घरफोड्या व मोटरसायकल चोऱ्या त्यानंतर ९ जुलै रोजी गोवा येथे एका रिक्षा चालकाला या टोळीने केलेले मारहाण व तेथील घरफोड्या याबाबत सिंधुदुर्ग पोलिसांनी हे गुन्हे गांभीर्याने घेतले होते. नुकत्याच हजर झालेल्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली हे गुन्हे उघडकीस आणल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, जे ए खंदरकर, अनिल हाडळ उपस्थित होते.

सावंतवाडी खासगीलवाडा येथे श्रमविहार कॉलनी मधील घरफोडीच्या प्रयत्न, लक्ष्मी नगर येथील एक मोटर सायकलची चोरी वेलनेस रिसॉर्ट येथील एक मोटर सायकल व दोन मोबाईल चोरी अशा गुन्हेगारी घटना नऊ जुलै रोजी रात्री घडल्या होत्या. बायकोच्या सारखे हत्यारे घटनास्थळी सापडली होती. तर चोरलेली मोटरसायकल सावडाव येथे टाकून फरार झाल्यानंतर ते कोल्हापूर पर्यंत पोहोचले व तेथून त्यांनी कर्नाटकात पोभारा केला होता. या आरोपीनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तीस ते पस्तीस गुन्हे केले आहेत. काही गुन्हा अटक होऊन ते जामिनावर सुटलेले होते. कर्नाटक राज्यातही त्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत.

फासेपारधी सराईत गुन्हेगार पाच ते सहा जणांची टोळी

सावडाव येथे तुरीची मोटरसायकल टाकून फरार झालेल्या या आरोपींचा शोध घेणे कठीण होते. कोणताही ठोस पुरावा नसतानाही सिंधुदुर्ग पोलिसांच्या या टीमने प्रथम कोल्हापूर नंतर कर्नाटक बेंगलोर पर्यंत त्यांचा माग काढला. कामासंद्रा या इलेक्ट्रिक शहरातील भागात लपून बसलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या टोळीत पाच ते सहा जण असण्याची शक्यता आहे. या संशयित आरोपींना जेरबंद करणारे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस कॉन्स्टेबल डॉमिनिक डिसोजा, सदानंद राणे, बस्त्याव डिसोजा, जॅक्सन घोणसालवीस, पोलीस अमलदार प्रथमेश गावडे, धनश्री परब व युवराज भंडारी यांचे ही जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यानी कौतुक केले.