आंतरराज्यीय घरफोडी आणि चोरी करणारे दोन सराईत आरोपी बेंगळुरूतून जेरबंद

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची कारवाई

दोघांनाही आठ दिवसांची पोलीस कोठडी

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी: महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये घरफोडी आणि चोरीचे अनेक गुन्हे केलेल्या दोन सराईत आरोपींना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील बेंगळूरु येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. शंकर मधुकर पवार ऊर्फ हाड्या (वय अंदाजे २५) आणि राजू मधुकर पवार ऊर्फ गुड्या (वय अंदाजे २४), दोघे रा. मोहोळ, जिल्हा सोलापूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनाही येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ९ जुलै रोजी रात्री १० ते १० जुलै रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी येथील न्यू खासकीलवाडा, श्रमविहार कॉलनी आणि लक्ष्मीनगर परिसरात घरफोडीचा प्रयत्न आणि मोटारसायकल तसेच दोन मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली होती. घटनास्थळी दोन पाळ कोयतेही मिळून आले होते. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १२९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, डॉ. मोहन दहिकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिले. हे पथक समांतर तपास करत असताना, संशयित आरोपी कोल्हापूरमार्गे कर्नाटकात आणि त्यानंतर बेंगळूरूत गेल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली.पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तात्काळ बेंगळूरु, कर्नाटक येथे रवाना झाले. १२ जुलै रोजी बेंगळूरु इलेक्ट्रीक शहरातील कामासंद्रा भागात लपून बसलेल्या या दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अधिक चौकशीतून समोर आले की, हे दोन्ही आरोपी मोहोळ, जिल्हा सोलापूर येथील आहेत आणि त्यांना यापूर्वी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ३० ते ३५ गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आले आहे. ते महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांतील अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोघेही घरफोडी आणि चोरीचे सराईत गुन्हेगार असून, संघटित टोळीच्या माध्यमातून त्यांनी या तिन्ही राज्यांमध्ये गुन्हे केल्याचे दिसून येते. सिंधुदुर्ग पोलिसांनी इतर राज्यांतील पोलीस दलांना सूचित केले असून, या आरोपींची इतर गुन्ह्यांमध्ये आवश्यकता असल्यास सिंधुदुर्ग पोलीस विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सावंतवाडी पोलीस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नवमी साटम आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, अमोल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक जे.ए. खंदरकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल डॉमिनिक डिसोझा, सदानंद राणे, बस्त्याव डिसोझा, जॅक्सन घोन्साल्वीस, पोलीस अंमलदार प्रथमेश गावडे, धनश्री परब आणि युवराज भंडारी यांचा समावेश होता.

याबाबत तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदरकर करत असून, त्यांना तपासकामी पोलीस उपनिरीक्षक झांझुर्णे, उपनिरीक्षक प्रमोद पाटील, उपनिरीक्षक लोहकरे, उपनिरीक्षक मुळीक, हवालदार वालावलकर, धुरी आणि सुरेश पाटील यांची मोलाची मदत मिळाली आहे. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.