हर्णै येथील सुवर्णदुर्ग किल्ला या ऐतिहासिक ठेव्याला जागतिक मानांकन

दापोली प्रतिनिधी (रुपेश वाईकर)

 

 

दापोली तालुक्यातील हर्णै येथील सुवर्णदुर्ग किल्ला युनेस्कोच्या मानांकन यादीत स्थान मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला इतिहासाची साक्ष देतो. या किल्ल्याबद्दल माहिती सांगताना अनेक ऐतिहासिक लढाया या किल्ल्याने अनुभवल्या आहेत. हर्णै हे प्राचीनकाळीही मोठे बंदर प्रसिध्द होत. ह्या बंदराच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या राजवटीत येथे दुर्ग चौकडी बांधण्यात आली. त्यापैकी समुद्रातील बेटावर बांधण्यात आलेला सूवर्णदूर्ग मुख्य किल्ला व त्याचे रक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेले उपकिल्ले कनकदूर्ग, गोवाकिल्ला व फत्तेगड हे किल्ले आहेत. १६८८ मध्ये मोगल सरदार सिद्दी कासीमने सुवर्णदुर्गाला वेढा घातला. सुवर्णदुर्गाचा किल्लेदार अचलोजी मोहिते मोगलांना फितूर झाला. ही गोष्ट कान्होजी आंग्रे ह्या २० वर्षाच्या तरूणाला कळल्यावर त्याने रातोरात गडावरील सहकार्‍यांना विश्वासात घेऊन किल्लेदाराला कैद केले व सरळ किल्ल्याबाहेर पडून मोगलांवर हल्ला केला. पण हल्ला साफ फसला आणि कान्होजी आणि त्याचे सहकारी मोघलांच्या कैदेत पडले. कान्होजीने शिताफीने मोघलांच्या कैदेतून सुटका करून घेतली व पोहत सुवर्णदुर्ग गाठला. या घटनेमुळे त्यांच्या सहकार्‍यांत उत्साह संचारला व त्यांनी पावसाळ्यापर्यंत गड लढवला. मराठ्यांचा हा चिवटपणा पाहून सिद्दीने वेढा उठविला. या घटनेमुळे कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्गाचा किल्लेदार बनला. ‘‘समुद्रावरील शिवाजी’’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कान्होजींची कारकीर्द याच सुवर्णदुर्गावर चालू झाली.

 

 

*इतिहास*

 

शिलाहारांनी उभारलेला हा किल्ला, १६व्या शतकात आदिलशहाकडे होता. १६६० च्या सुमारास शिवरायांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला व त्याची फेरउभारणी करुन बळकट केला. किल्ल्याचे लपवलेले प्रवेशद्वार ह्याची साक्ष देत उभे आहे. राजाराम महाराजांच्या काळात कान्होजी आंग्रे यांनी सूवर्णदूर्गच्या किल्लेदाराची फितूरी मोडून काढली. पेशवे व तुळाजी आंग्रे ह्यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे आंग्र्यांचा बिमोड करण्यासाठी इ.स. १७५५ मध्ये पेशवे व इंग्रजांच्या संयुक्त सैन्याने सुवर्णदुर्गावर हल्ला केला व सूवर्णदूर्ग जिंकून घेतला.

 

१८०२ साली यशवंतराव होळकरांच्या भीतीने सैरावैरा पळणारा दुसरा बाजीराव काही काळ सूवर्णदूर्गाच्या सुरक्षित आश्रयाला राहिला, नंतर स्वत:चा कुटुंबकबिला तिथेच सोडून वसईला इंग्रजांच्या आश्रयाला गेला. नोव्हेंबर १८१८ मध्ये कर्नल केनडी, कॅप्टन कॅपेल व लेफ्टनंट डॉमिनिसेट यांनी अवघ्या ५० शिपाई व ३० खलाशांनीशी हल्ला चढवून किल्ला ताब्यात घेतला.

 

*गडावरील पहाण्याची ठिकाणे*

 

किल्ल्याचा मुख्य दरवाजा ‘‘गोमुखी‘‘ पद्धतीचा आहे. हा दरवाजा जरी उत्तराभिमुख असला तरी तो पूर्वेकडील बाजूस आहे. दरवाज्यासमोर वाळूची पूळण व त्यात पडलेल्या तोफा आहेत. दरवाजाला अधिक संरक्षण देण्यासाठी केलेल्या बांधकामाचे अवशेषही दरवाज्याच्या अलिकडे आहेत. मुख्य दरवाजाच्या उजव्या तटावर मारुतीची मूर्ती आहे. किल्ल्याच्या पायरीवर कासव कोरलेले आहे. गडाला १५ बुरुज असून गडाची तटबंदी बर्‍यापैकी शाबूत आहे. किल्ल्यावर विहीर व पावसाचे पाणी साठवणारा तलाव आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूच्या तटाजवळ विहीर आहे. तेथून पुढे आल्यावर वाड्याचे अवशेष व दोन कोठारे लागतात. किल्ल्याच्या अरुंद नैऋत्य टोकावरील बुरुजावरुन हर्णेच्या किनार्‍यांवरील कनकदूर्ग, फत्तेगड व गोवा किल्ला हे किल्ले दिसतात. गडाच्या पश्चिमेस चोर दरवाजा व जवळच तटाला लागून पावसाचे पाणी साठवण्याचा तलाव आहे. किल्ल्याच्या वायव्य टोकावर पाण्याच टाक, दारुचे कोठार व उध्वस्त वास्तु आहे. किल्ल्याच्या सभोवार असणारा खडक समुद्राच्या पातळीत तासून सपाट केलेला आहे व मधल्या उंचवट्यावर किल्ला बांधला आहे.

 

*गडावर पोहोचण्याच्या वाटा*

 

मुंबईहून दापोलीमार्गे १५ किमी वरील हर्णेला जाता येते. हर्णे किनार्‍यांवरुन किल्ल्यावर जाण्यासाठी होड्या मिळतात. गडावर भोजनाची, स्वच्छ पाण्याची व निवासाची कोणतीही व्यवस्था नसून ही व्यवस्था हर्णै गावात आहे. एका दिवसात सूवर्णदुर्ग, गोवा किल्ला, कनकदुर्ग व फत्तेगड एका दिवसात पाहाता येतात.

 

 

*ही आमची मंदिरे आहेत असं सांगत पालकमंत्र्यांकडून आनंद व्यक्त*

 

युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांची यादी जाहीर केली, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 11 किल्ले समाविष्ट झाले आहेत. हा महाराष्ट्राचा अभिमान तर नक्कीच आहे आणि कोकणवासियांचा देखील अभिमान आहे, अशी प्रतिक्रीया पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

 

 

ते पुढे म्हणाले की, राजधानी रायगडसह सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या जलदुर्गांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये मानांकन मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वारसा जागतिक पातळीवर नेण्याच्यादृष्टीने युनेस्कोने घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी अभिमानाचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी कारकीर्द या महाराष्ट्रामध्ये केली, त्याला उजाळा देणारा आहे. तामिळनाडूमधील एक किल्ला त्याच्यामध्ये आहे. तामिळनाडू सरकारचे देखील मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. महाराष्ट्राने वर्षोनुवर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपल्यामुळे आणि ही सगळी जी स्थळं आहेत, ही आमची मंदिरं आहेत, अशा भावनेतून महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांकडे बघितल्यामुळे आज त्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये मानांकन मिळाले आहे. युनेस्कोचे देखील मनःपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ज्वलंत इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राचे सरकार कटिबद्ध आहे, हे देखील सांगतो अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली

 

 

 

*हर्णै येथे पारंपरिक वेशभूषेत रॅली कडून आनंदोत्सव साजरा*

 

 

दरम्यान दापोली तालुक्यातील हर्णै येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा समावेशही युनेस्कोचे जागतिक मानांकनाच्या यादीत झाल्याने परिसरात आनंद व्यक्त करण्यात आला. तहसीलदार अर्चना बोंबे,पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या उपस्थितीत हर्णै येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक विद्यार्थी, महिला यांचा उत्स्फूर्त सहभाग असलेली पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोठी रॅली गाव परिसरातून शनिवारी सकाळी काढण्यात आली. त्या ऐतिहासिक वारसा स्थळाची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आल्याने गावातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असून आता शासनाने भुईकोट किल्ला व पाण्याची सुवर्णदुर्ग किल्ला जोडण्यासाठी मंजूर केलेल्या रोपवे च्या कामाला गती द्यावी अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. भुईकोट किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला या रोपवे प्रकल्पाला शासनाकडून यापूर्वी मंजुरी देण्यात आली आहे.

 

*युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यामूळे आम्हा ग्रामस्थांना खूपच आनंद होत आहे. दापोली तालुक्यातील एकमेव आमचं हर्णे गावातील या किल्ल्याला हा जागतिक वारसा मिळाल्यामुळे जगाच्या नकाशावर हर्णे गावाची नोंद झाली आहे. आता या किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच, सांस्कृतिक वारसाचे जतन सुनिश्चित होईल, असे आनंद व्यक्त करताना हर्णे येथील जय भवानी प्रतिष्ठान चे सर्वेसर्वा श्री दीपक खेडेकर यांनी सांगितले.*