लांजा आयटीआय समोरील घटना
लांजा (प्रतिनिधी) दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका स्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर लांजा शहरातील आयटीआय समोर झाला.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार १२ जुलै रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास शैलेश शिवराम जाधव (वय ४५, रा.तोणदे बौद्धवाडी व सद्ध्या रा.परटवणे अशोक नगर ता.जि.रत्नागिरी) हे त्यांच्या मालकीची पॅशन प्रो दुचाकी क्रमांक (एम.एच.०८.एटी.८६७१) घेऊन तोणदे ते लांजा असा प्रवास करत होते. दरम्यान, लांजा शहरातील आयटीआय येथून ते प्रवास करत असताना समोरून येणारा दुचाकीस्वार आशिष संदीप घडशी (वय २२, रा.कुर्णे घडशीवाडी, ता.लांजा, जि.रत्नागिरी) याने आपल्या ताब्यातील एक्टिवा दुचाकी क्रमांक (एम.एच.०८.एडब्ल्यू.००९१) चालवत येऊन शैलेश जाधव यांना धडक दिली.
अपघातानंतर शैलेश जाधव हे रस्त्यावर पडले होते. त्यांमुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती . या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले आणि गंभीर जखमी शैलेश जाधव यांना रुग्णवाहिकेने लांजा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र येथील वैद्यकीय अधिकारी यांनी शैलेश जाधव यांना तपासून मृत घोषित केले. या अपघातात आशिष घडशी हा किरकोळ जखमी झाला आहे.
दरम्यान, आपल्या ताब्यातील दुचाकी हयगयीने, वेगाने तसेच रस्त्याच्या रॉंग साईडने चालवत शैलेश जाधव याला समोरून धडक देत त्याच्या दुखापतीस व मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी आशिष घडशी याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(२), २८१, १२५(अ) १२५(ब) व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत.










