उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
प्रशांत यादव यांच्याकडून ठोस मागणी
चिपळूण (प्रतिनिधी) : अलोरे व पोफळी परिसरातील महावितरणच्या कंत्राटी कामगारांच्या समस्या ऐरणीवर आणण्यासाठी रविवारी पाली येथे राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ठेकेदार व अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली.
या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी कामगारांचे विविध प्रश्न मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी ठोसपणे सांगितले की, “कंत्राटी पद्धतीत काम करणाऱ्या या कामगारांचे शोषण थांबवले पाहिजे. त्यांना शाश्वत रोजगार, वेतन सुरळीतपणे मिळावे, सुरक्षेच्या दृष्टीने सुविधा पुरवण्यात याव्यात,” अशी ठाम मागणी त्यांनी केली. या बैठकीस राजेंद्र महाडिक, विनोद झगडे, चंद्रकांत सुवार, सतीश पोद्दार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. बैठकीपूर्वी प्रशांत यादव यांनी ना. उदय सामंत यांचे औपचारिक स्वागत केले. कामगारांच्या न्यायहक्कांसाठी झालेल्या या बैठकीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मंत्री सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत “कामगारांना न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करू,” असे आश्वासन दिल्याचे समजते.











