अनेक इच्छुकांचे पत्ते कट : नवीन चेहऱ्यांना संधी
तालुक्यातील ३६ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत जाहीर
दोडामार्ग : प्रतिनिधी
तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमधील सरपंच पदाचे आरक्षण मंगळवारी जाहीर झाले. यामध्ये तालुक्यातील निम्म्या म्हणजेच १८ ग्रामपंचायतीवर महिलाराज असणार आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेक गावांमध्ये दिग्गज इच्छुकांचे सरपंच बनण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी जाहीर केले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस, मंडळ अधिकारी शरद शिरसाट उपस्थित होते. तहसील कार्यालयाच्या सभागृहात कौस्तुभ केशव खांबल या विद्यार्थ्याच्या हस्ते चिट्ठीद्वारे ही सोडत पद्धत पार पडली. यावेळी अनेक गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या सोडतीमुळे अनेकांची सरपंच पदाची संधी हुकल्याचे दिसून आले. अनेक गावात नवीन चेहऱ्यांना संधी प्राप्त झाली आहे. काही ठिकाणी राजकीय समीकरणे नव्याने जुळवाजुळव सुरू झाली आहे.सन २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी ही आरक्षण लागू राहणार असल्याचे तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी सांगितले.
आरक्षणाची तपशीलवार माहिती पुढील प्रमाणे :
नागरिकांचा मागास प्रवर्ग : वझरे, खोक्रल, आडाळी, आंबडगाव, तळेखोल.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : घोटगे, मोर्ले, कोलझर, झरेबांबर, पाट्ये पुनर्वसन सासोली खुर्द.
अनुसूचित जाती (महिला) : साटेली भेडशी
अनुसूचित जाती प्रवर्ग : तेरवण मेढे
खुला प्रवर्ग : आयनोडे हेवाळे, कळणे, विर्डी , कोनाळ, आयी, उसप, कुडासे खुर्द, केर, झरे २, फुकेरी, माटणे, मोरगाव, सासोली.
खुला प्रवर्ग (महिला) : कुडासे, तळकट, कुंब्रल, घोटगेवाडी, झोळंबे, परमे पणतुर्ली, बोडदे, बोडन, मणेरी, मांगेली, पिकुळे, मोरगाव.










