निवृत्त कलाशिक्षक कृष्णनाथ दाभोळे यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा उत्साहात

गुणदेच्या सरस्वती शिक्षण संकुलात गुणवंतांचा सत्कार

खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील गुणदे येथील सरस्वती शिक्षण संस्थेच्या “ज्ञानसाधना सभागृहात’ दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालयाचे निवृत्त कलाशिक्षक कृष्णनाथ मनोहर दाभोळे यांचा ८१ वा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विक्रांत दत्ताजीराव आंब्रे यांच्या हस्ते कलाशिक्षक दाभोळे सर यांना गौरविण्यात आले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन, सरस्वती पूजन व गुरुपुजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी शाळेचा सलग सात वर्षे १०० टक्के निकाल लागल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. त्यानंतर एस.एस.सी. २०२५ गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यामध्ये यशाचे पहिले पाच मानकरी कु. रिया जांभळे, कु. सृष्टी सालेकर, कु. समृद्धी निमकर, कु. पवित्रा कदम व कु. श्रेयस कलये या विद्यार्थ्यांना सत्कारित करण्यात आले. तसेच शिक्षण प्रेमींनी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून येणारी रक्कम गरजू व होतकरू विद्यार्थी कु. संगम तांबे याला देऊन सत्कारित करण्यात आले.
यावेळी कलाशिक्षक कृष्णनाथ दाभोळे सर यांना ८१ व्या वाढदिवसानिमित्त श्री. दाभोळे यांचे सपत्नीक ८१ दिव्यांच्या साक्षीने औक्षण करण्यात आले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रांत दत्ताजीराव आंब्रे यांनी श्री. दाभोळे सर यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यानंतर सद्‌गुरू काडसिद्धेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी सुशील जोशी यांनी सुद्धा श्री. दाभोळे सर यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर सर्वांच्या समवेत केक कापण्यात आला व सर्वांनी श्री. दाभोळे सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठान गुणदेचे कार्याध्यक्ष संजय दत्ताजीराव आंब्रे यांनी सरांच्या प्रति गौरवोद्‌गार काढले व सरांची शाळेप्रती असणारी तळमळ, प्रेम बोलून दाखविली. तसेच सरस्वती शिक्षण संस्थेचे सहसचिव व श्री. दाभोळे सरांचे विद्यार्थी राजेंद्र दत्ताराम आंब्रे यांनी सुद्धा आपल्या भाषणातून सरांना शुभेच्छा दिल्या. शेवटी सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रांत आंब्रे यांनी आपल्या भाषणातून बोलताना सांगितले कि, मी सुद्धा सरांचा विद्यार्थी आहे. असे शाळेप्रती व विद्यार्थ्यांप्रती प्रेम, तळमळ व निष्ठा असणारे शिक्षक आम्हाला लाभले, आम्ही धन्य झालो व दाभोळे सरांना त्यांच्या शतकपूर्तीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव सुभाष पवार, संचालक अशोक शांताराम आंब्रे, विष्णु शंकर आंब्रे, संजय दत्ताजीराव आंब्रे, अविनाश बाळाराम आंब्रे, दिपक श्रीपत आंब्रे, विलास रघुनाथ आंब्रे, राजेंद्र विष्णु आंब्रे, प्रकाश सिताराम आंब्रे तसेच सत्कारमूर्ती कृष्णनाथ मनोहर दाभोळे सर व दाभोळे मॅडम, गुणदे गावचे सरपंच रवींद्र आंब्रे, श्री. प्रभाकर (जगनभाऊ) आंब्रे, सदानंद काशिराम आंब्रे व संभाजी राजाराम आंब्रे तसेच संदेश सुर्यकांत म्हामुणकर, सौ. अमृता म्हामुणकर, संतोष आंब्रे, संतोष पाटोळे, शिवाजी सावंत, यशवंत आंब्रे, अनंत आंब्रे, सागर आंब्रे, प्रमोद पोफळकर, अक्षय आंब्रे इतर ग्रामस्थ व गुणवंत विद्यार्थ्यांचे आई-वडील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कराडकर यांनी तर श्री. सुतार यांनी आभार मानले.