लांजा (प्रतिनिधी) युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेतील रत्नागिरी
जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सत्कार समारंभ २० जुलै रोजी रत्नागिरी येथे होणार आहे. यावेळी शिक्षक अजय आगरे यांना ‘युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
रत्नागिरी साळवी स्टाॅप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने इस्त्रो सफर आणि लाखो रुपयांची रोख पारितोषिके , गोल्ड, सिल्व्हर, ब्रांझ मेडल्स, प्रमाणपत्र देऊन गौरव करणाऱ्या या सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभा प्रसंगी जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना तसेच युवा संदेश प्रतिष्ठान यांच्यावतीने सन २०२४-२५ यावर्षी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या रत्नागिरी जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार रत्नागिरी जिल्हा मर्यादित असून युवा संदेश प्रतिष्ठानच्या तज्ञ कमिटी मार्फत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव न मागवता शालेय विद्यार्थी, पालक, शालेय परिसरातील ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
चालू वर्षी प्राथमिक विभागामधून जि प शाळा पूर्णगड खारवीवाडा ता.रत्नागिरीचे उपशिक्षक आशिष खेमा सावंत आणि माध्यमिक विभागातून लांजा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व तु पु शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजाचे सहायक शिक्षक अजय विजय आगरे यांची निवड करण्यात आली आहे.
युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील हे दुसरे वर्ष असून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कारमूर्तीं व सिंधुरत्न परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जि प सिंधुदुर्गच्या माजी अध्यक्षा सौ संजना संदेश सावंत यांनी अभिनंदन केले असून या विद्यार्थी व शिक्षक सत्कार समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुरत्न परिवारातर्फे स्पर्धा प्रमुख सुशांत मर्गज, जिल्हा समन्वयक श्रीधर दळवी व उमेश केसरकर यांनी केले आहे.













