सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची कारवाई
संशयिताला २१ जुलै पर्यंत पोलीस कोठडी
सावंतवाडी | प्रतिनिधी:गोवा टॅक्सी चालक हल्ला प्रकरण आणि सावंतवाडीतील मोटारसायकल चोरी प्रकरणात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (Local Crime Investigation Branch) आणखी एका संशयित आरोपीला तुळजापूरमधून ताब्यात घेतले आहे. अजय सुनील भोसले (वय २७, रा. तुळजापूर) असे या संशयिताचे नाव असून, त्याला न्यायालयात हजर केले असता २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यापूर्वी, याच प्रकरणात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील बंगळूरु येथून दोन सराईत आरोपींना मोठ्या कौशल्याने अटक केली होती. शंकर मधुकर पवार ऊर्फ हाड्या (वय अंदाजे २५) आणि राजू मधुकर पवार ऊर्फ गुड्या (वय अंदाजे २४), दोघे रा. मोहोळ, जिल्हा सोलापूर अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, ९ जुलै रोजी रात्री १० ते १० जुलै रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी येथील न्यू खासकीलवाडा, श्रमविहार कॉलनी आणि लक्ष्मीनगर परिसरात घरफोडीचा प्रयत्न आणि मोटारसायकलसह दोन मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली होती. घटनास्थळी दोन पाळ कोयतेही आढळून आले होते. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १२९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नवमी साटम आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.












