दापोली l प्रतिनिधी:-दापोली तालुक्यातील उन्हवरे परिसरात सध्या बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून,एकाच वेळी दोन जनावरांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यामध्ये एक गाय जागीच ठार झाली. तर दुसरी वाघाच्या तावडीतून सुटून गोठ्यापर्यंत पोहचली. मात्र दुसऱ्या दिवशी तीही गतप्राण झाल्याने शेतकरी वर्गात या वाघाची चांगली भीती निर्माण झाली आहे.शेतकरी शांताराम कानसरे व शेतकरी सुनिल कदम आपली जनावरे उन्हवरे सडा परिसरात चरावयास घेऊन गेले असता, जनावरे चरत असतानाच वाघाने या जनावरांवर अचानक प्राणघातक हल्ला केला.यामध्ये एका गाईचा मृत्यू झाला, तर एक गाय वाघाच्या तावडीतून कशीबशी जखमी अवस्थेत निसटली.मात्र ती दुसऱ्या दिवशी मृत झाली. वनविभागाने या घटनेचा पंचनामाकरून नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येत असल्याची माहिती दापोली वन विभागाने दिली.मात्र सदर हल्ला हा बिबट्याने केला नसून पट्टेरी वाघाने केल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.याबाबत दापोली वनविभागाकडे चौकशी केली असता दापोली तालुक्यात पट्टेरी वाघ अस्तित्वात नसून उन्हवरे भागात बिबट्याचा अधिवास असल्याचे स्पष्ट केले.












