रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाने आपली जोरदार बॅटिंग सुरू ठेवली आहे. सकाळपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण जिल्ह्यात ३५४.७८ मिमी पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्याचा सरासरी पाऊस ३९.४२ मिमी राहिला आहे.
आज राजापूर तालुक्यात सर्वाधिक ६६.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल चिपळूण (६३.११ मिमी), लांजा (५५.२० मिमी) आणि रत्नागिरी (५३.६६ मिमी) तालुक्यांमध्येही चांगला पाऊस झाला आहे. दुसरीकडे, दापोली तालुक्यात सर्वात कमी १४.७१ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच, मंडणगड (१९.७५ मिमी), खेड (३३.८५ मिमी), गुहागर (२७.०० मिमी) आणि संगमेश्वर (२१.२५ मिमी) येथेही पावसाची संततधार सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, शेतीच्या कामांना गती मिळाली आहे. मात्र, काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन थोडे विस्कळीत झाले आहे. पुढील २४ तासांतही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.











