रत्नागिरी जिल्ह्यात १९ ते २३ जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढणार

 

शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला

रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि भारत मौसम विभागाच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी १८ जुलै २०२५ रोजी हवामानावर आधारित कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे. यानुसार, १९ ते २३ जुलै या कालावधीत जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी त्यानुसार पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाचा अंदाज आणि इशाऱ्यांचा शेतीवरील परिणाम:

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार, १८ ते २० जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रति तास) येण्याची शक्यता आहे. तर, २१ व २२ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात पूर्णतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला:

* सामान्य सल्ला: नवीन लागवड केलेली आंबा, काजू कलमे तसेच नारळ व सुपारीची रोपे कोलमडू नयेत यासाठी त्यांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा. रासायनिक खतांच्या मात्रा, कीटकनाशक/बुरशीनाशक फवारणी आणि आंब्यासाठी पॅक्लोब्युट्रॉझॉलची मात्रा पावसाची उघडीप पाहून किंवा तीव्रता कमी असताना करावी. फवारणीच्या वेळी द्रावणात स्टिकर मिसळावे.

* खरीप भात:

* पुनर्लागवडीनंतर पहिल्या ३० दिवसांपर्यंत शेतात पाण्याची पातळी २.५ ते ५ सेमी ठेवावी आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

* भात पुनर्लागवडीची कामे पावसाची तीव्रता कमी असताना पूर्ण करून घ्यावीत. १२ ते १५ सेमी उंचीची आणि ५ ते ६ पाने फुटलेली रोपे लावणीसाठी वापरावीत.

* चिखलणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे.

* डोंगर उतारावरील भात रोपे वाहून जाऊ नयेत यासाठी तीव्र वेगाने येणारे पाणी इतरत्र वळवण्याची व्यवस्था करावी.

* कीड नियंत्रण:

* सुरळीतील अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास शेतातील पाणी बांधून ठेवावे, जाड दोर ओढून अळ्या पाण्यात पाडाव्यात, पाणी काढून अळ्या नष्ट कराव्यात. गरज भासल्यास फेनथोएट ५०% प्रवाही १००० मिली ५०० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.

* निळे भुंगेरे दिसल्यास क्विनॉलफॉस २५ टक्के २००० मि.ली. किंवा लॅमडा सायहॅलोथ्रिन ५ टक्के २५० मि.ली. यापैकी एका कीटकनाशकाची ५०० लि. पाण्यातून फवारणी करावी.

* खेकड्यांच्या नियंत्रणासाठी विषारी आमिषाचा वापर करावा किंवा १० तास भिजलेले चिंचोके बिळात ठेवून बिळे बुजवावीत.

* भात रोपवाटिकेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी चारही बाजूंनी चर खोदावेत.

* नागली, वरी: लागवडीसाठी ३० दिवसांची रोपे एका ठोंबात दोन याप्रमाणे लावावीत. हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. रोपवाटिकेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

* नारळ: वाढलेल्या आर्द्रतेमुळे कोंब कुजणे या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. कुजलेला कोंब साफ करून १% बोर्डोमिश्रण ओतावे आणि प्रतिबंधात्मक फवारणी करावी. इरीयोफाईड कोळी नियंत्रणासाठी निंबोळी पेंड ५ किलो प्रति झाड द्यावे. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

* आंबा: नियमित फळधारणेसाठी पॅक्लोब्युट्रॉझॉल (उदा. कल्टार/सेलस्टार) झाडाच्या आकारमानानुसार १५ जुलै ते ३१ ऑगस्ट दरम्यान द्यावे. फांदेमर रोगासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड ०.३% किंवा ०.१% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

* काजू: फांदेमर रोगासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड ०.३% किंवा ०.१% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

* सुपारी: आर्द्रतेतील वाढीमुळे कोळेरोग (बुरशीजन्य) प्रादुर्भाव दिसू शकतो. यासाठी रोगट शिंपुटे आणि वाळलेल्या झावळ्या नष्ट कराव्यात. पानांच्या बेचक्यात १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

* हळद: लागवडीनंतर दीड महिन्यांनी ८५० ग्रॅम युरिया प्रति गुंठा नत्र खताची पहिली मात्रा द्यावी. कंद माशीच्या नियंत्रणासाठी प्लास्टिकच्या बरणीत सुकी मासळी ठेवून ४-५ दिवसांनी जाळावी. अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

* वेलवर्गीय भाजीपाला (पडवळ, कारली, दुधी भोपळा, शिराळी): वेलांना आधार द्यावा आणि मंडपाची व्यवस्था करावी. लागवडीनंतर एक महिन्यांनी प्रति वेल १० ग्रॅम युरिया नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी. तांबडे भुंगेरे, तुडतुडे, मावा दिसल्यास डायमिथोएट १५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.

पशुधन आणि कुक्कुटपालन:

जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ कोमट पाणी व हिरव्या वैरणीची व्यवस्था करावी. गायी आणि म्हशींना फऱ्या आणि घटसर्प रोग प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. ब्रॉयलर पक्ष्यांना त्यांच्या वजनानुसार खाद्य द्यावे. मांसातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी १.५% काळे जिरे पावडर, ०.५% हळद पावडर किंवा १% आले भुकटी द्यावी.

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी विद्यापीठाचे केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.