ज्येष्ठ खलनायक तुकाराम (अण्णा) गावडे यांना २०२५ चा ‘कलातपस्वी’ पुरस्कार बहाल

 

– दत्तमाऊली दशावतार लोककला मंडळाचा गौरव सोहळा उत्साहात

कुडाळ l प्रतिनिधी

दत्तमाऊली पारंपारिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने देण्यात येणारा २०२५ सालचा ‘कलातपस्वी’ पुरस्कार यंदा जेष्ठ खलनायक आणि चार तपांहून अधिक काळ दशावतारात कार्य करणारे मा. श्री. तुकाराम (अण्णा) गावडे यांना प्रदान करण्यात आला.

 

दशावतार ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख असून या कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी दरवर्षी मंडळ विविध उपक्रम राबवते. यामध्ये रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, गरजूंना मदतकार्य, तसेच दशावतार प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले जाते. याच उपक्रमांतर्गत ‘कलातपस्वी’ हा पुरस्कार दशावतारातील सर्वोच्च सन्मान मानला जातो.

 

या वर्षीचा पुरस्कार समारंभ रामेश्वर मंगल कार्यालय, वालावल हमरमळा येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. लक्ष्मण लिंगायत होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रेमानंद देसाई, श्री. सोनू गवस, श्री. पी. डी. देसाई, श्री. धोंडू रेडकर गुरुजी, श्री. चारुदत्त तेंडोलकर, श्री. बाबा कांदळगावकर, श्री. संजय मांजरेकर, मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबा मयेकर, श्री. तेजस देसाई, पत्रकार श्री. रत्नदीप गावस, पत्रकार श्री. विजय शृंगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

तत्पूर्वी सकाळी ९.३० वाजता दशावतार प्रशिक्षण वर्गाला गणेश स्तवनाने सुरुवात झाली. उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर श्री. प्रकाश परब, श्री. प्रवीण मार्गी, प्रशिक्षक हरिश्चंद्र गावकर, संतोष रेडकर, सुधीर तांडेल, प्रभाकर दळवी, गजानन देसाई, हरेश नेमळेकर, गजानन बांबुळकर यांच्यासह आंदुर्लेचे सरपंच श्री. अक्षय तेंडोलकर आणि उपसरपंच श्री. चंद्रकिशन मोर्ये उपस्थित होते.

 

प्रशिक्षण सत्रात दशावतारातील विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन झाले. विदूषकाची भूमिका कशी असावी याविषयी श्री. संतोष रेडकर यांनी सांगितले. स्त्री अभिनयातील बारकावे श्री. सुधीर तांडेल यांनी उलगडले, तर दु:खद प्रसंगातील अभिनय हरिभाऊंनी सादर केला. संगीत ताल यांचे शास्त्रीय महत्त्व श्री. गजानन देसाई यांनी स्पष्ट केले, तर संगीत साथ कशी असावी यावर हरेश नेमळेकर, प्रभाकर दळवी, गजानन देसाई यांनी माहिती दिली.

 

या कार्यक्रमात दत्तमाऊली संस्थेचे अध्यक्ष श्री. सीताराम मयेकर यांच्यासह शिवप्रसाद मेस्त्री, दत्तप्रसाद शेणई, मोरेश्वर सावंत, स्वप्नील नाईक, रामचंद्र रावले, दत्तप्रसाद तवटे, सदानंद केळूसकर, सुजय घाडीगावकर, संकेत कुडव, निखिल निकम, न्हानू कोरगावकर, संजय भगत, रुपेश नेवगी व इतर कार्यकर्ते, प्रथमेश सावंत, किरण सावंत, समीर आपटे, सुयश ठाकूर तसेच अनेक रसिक उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मोरेश्वर सावंत आणि श्री. रुपेश नेवगी, प्रस्तावना श्री. दत्तप्रसाद शेणई, तर आभार प्रदर्शन श्री. शिवप्रसाद मेस्त्री यांनी केले.

संपूर्ण सोहळा अत्यंत प्रेरणादायी आणि सांस्कृतिक समृद्धतेचा अनुभव देणारा ठरला.