एस्. एस्. पी. एम. इंजीनीरिंग कॉलेज कणकवली, चे प्राध्यापक श्री. सौरभ सदानंद कुलकर्णी यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून यशस्वीरीत्या डॉक्टरेट (Ph.D.) पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल विविध क्षेत्रांतून कौतुक आणि अभिनंदन व्यक्त होत आहे.
“पवनचक्की पाते संरचनेतील क्रॅकमुळे येणारे कंपन विश्लेषण करून भविष्यातील संभाव्य धोक्याची सूचना देणारी कार्यप्रणाली” या विषयावर त्यांनी सैद्धांतिक आणि प्रायोगिक पातळीवर संशोधन केले. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांमध्ये पवनऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने, तिच्या संरचनेतील दोषांचे अचूक परीक्षण आणि त्यावरील कंपन विश्लेषण हे अत्यंत आवश्यक ठरत आहे. डॉ. कुलकर्णी यांचे हे संशोधन पात्याच्या संरचनात्मक आरोग्य परीक्षणासाठी महत्त्वाचे योगदान ठरले आहे. या प्रबंधाचे मार्गदर्शन प्रा. डॉ. सुरेश ए. पाटील यांनी केले. संशोधनातील नवोपक्रम, तांत्रिक अचूकता आणि सखोल अभ्यास यामुळे विद्यापीठस्तरावर त्यांच्या प्रबंधास मान्यता मिळाली.
डॉ. सौरभ कुलकर्णी सध्या एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणकवली येथे यांत्रिकी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या शिक्षण प्रवासात शिवाजी विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रात यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. त्यांच्या सातत्य, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीमुळे त्यांनी ही शैक्षणिक उंची गाठली आहे.
त्यांच्या या यशामध्ये आई वडील आणि पत्नी यांचा मोलाचा वाटा आहे. या यशामुळे संपूर्ण कुटुंबीय, शिक्षक, सहकारी आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस्. बाडकर यांनी डॉ. एस्. एस्. कुलकर्णी यांना शुभेच्छा देत प्रतिपादन केले की “नवोदित संशोधकांसाठी कुलकर्णी सरांची ही वाटचाल प्रेरणादायी ठरेल”. डॉ. कुलकर्णी यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन कारकिर्दीसाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत.













