‘वी सर्व्ह’ ब्रीदवाक्याला जागून समाजाची सेवा करा

डॉ. किरण खोराटे यांचे आवाहन

सावंतवाडी । प्रतिनिधी : लायन्स क्लब इंटरनॅशनलचे उपप्रांतपाल डॉ. किरण खोराटे यांनी ‘वी सर्व्ह’ (We Serve) या ब्रीदवाक्यानुसार समाजातील सर्व घटकांबाबत सामाजिक बांधिलकीने कार्य करून लायन्स क्लबची प्रतिमा जनतेत उंचावण्याचे आवाहन केले. सावंतवाडी लायन्स क्लबच्या २०२५-२६ च्या कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते.

या सोहळ्याला डॉ. किरण खोराटे यांच्यासह माजी प्रांतपाल ला. अजित फाटक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नवीन अध्यक्ष म्हणून ॲड. अभिजीत पणदुरकर, सचिव म्हणून विजय चव्हाण आणि कोषाध्यक्ष म्हणून प्रकाश राऊळ यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.

मावळते सेक्रेटरी अभिजीत पणदुरकर यांनी मावळत्या वर्षातील कार्याचा आढावा सादर केला, तर खजिनदार सुनील दळवी यांनी वार्षिक जमा-खर्चाचा तपशील दिला. अध्यक्ष अमेय पै यांनी स्वागतपर भाषण केले आणि येत्या वर्षात दोन नवीन क्लब स्थापन करण्याचे अभिवचन दिले.

माजी प्रांतपाल अजित फाटक यांनी नवीन टीमला शुभेच्छा दिल्या आणि कोणत्याही सहकार्यासाठी नेहमी उपलब्ध असल्याचे सांगितले. डॉ. किरण खोराटे यांनी पदाधिकारी आणि संचालक मंडळाला त्यांच्या कार्याची माहिती देऊन कर्तव्य पालनाची शपथ दिली.

या कार्यक्रमात गतवर्षी उत्कृष्ट कार्य केलेल्या संतोष चोडणकर, गजानन नाईक, महेश पाटील, अमेय पै, संदीप कोटकर यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. मालवण, कुडाळ, कणकवली येथील लायन्स क्लबचे पदाधिकारी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी रिजन चेअरमन गजानन नाईक यांनी केले, तर नूतन सचिव विजय चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.