‘आयएनएस गुलदार’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर दखल
मुंबई, दि. २८ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) महत्त्वाकांक्षी ‘आयएनएस गुलदार’ या प्रकल्पाला प्रतिष्ठेचा ‘द वीक हेरिटेज ॲवॉर्ड – गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला आहे. भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय, कृत्रिम प्रवाळभित्ती आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प म्हणून विकसित होत असलेल्या या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अभिनंदन केले.
‘द वीक’ मासिकातर्फे ‘द वीक हेरिटेज ॲवॉर्ड – गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यासाठी नवी दिल्ली येथील प्रधानमंत्री संग्रहालय व ग्रंथालय येथे २७ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित समारंभात केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे(भाप्रसे) यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने, अधीक्षक अभियंता संजय पाटील, ॲक्वाटिक टूरिझमच्या वरिष्ठ व्यवस्थापक क्षिप्रा बोरा, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र सोनावणे आदी उपस्थित होते.
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “‘द वीक हेरिटेज ॲवॉर्ड’ अंतर्गत मिळालेला ‘गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ हा सन्मान महाराष्ट्राच्या पर्यटन विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळणे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. ‘आयएनएस गुलदार’ हा प्रकल्प पर्यटनाच्या पारंपरिक संकल्पनेपलीकडे जाऊन आधुनिक पर्यटन अनुभवांची सांगड घालणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेला नवी दिशा मिळेल. हा पुरस्कार मिळविण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो.”
राज्यात दर्जेदार, शाश्वत पर्यटन विकास : सचिव संजय यादव(भाप्रसे)
पर्यटन सचिव संजय यादव म्हणाले, “‘आयएनएस गुलदार’ प्रकल्पाला मिळालेला ‘गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ हा महाराष्ट्राच्या नाविन्यपूर्ण पर्यटन विकासाच्या प्रयत्नांचा गौरव आहे. सागरी वारशाचे संवर्धन, पर्यावरणपूरक पर्यटन आणि पर्यटकांना अनोखा अनुभव देणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा पुरस्कार महत्त्वाचा आहे. राज्यात दर्जेदार, शाश्वत आणि जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेणारे पर्यटन प्रकल्प विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
‘आयएनएस गुलदार’ प्रकल्पाचे वैशिष्ट्य : व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे(भाप्रसे)
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘आयएनएस गुलदार’ या नौकेवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला नवी ओळख मिळण्यासोबतच स्थानिक पर्यटन व्यवसाय, निवास व्यवस्था, वाहतूक, मार्गदर्शक सेवा आणि इतर पूरक व्यवसायांना चालना मिळणार आहे.
एक्स-आयएनएस गुलदार : वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटन प्रकल्प
पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) मे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या समन्वयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका ‘एक्स-आयएनएस गुलदार’ हा देशातील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटन प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयांतर्गत ‘स्पेशल असिस्टन्स टू स्टेट्स फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट – डेव्हलपमेंट ऑफ आयकॉनिक टुरिस्ट सेंटर्स टू ग्लोबल स्केल’ या योजनेअंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ४६.९१ कोटी रुपये, तर महाराष्ट्र शासनाने ११२.४६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.
‘एक्स-आयएनएस गुलदार’ ही भारतीय नौदलातील ‘मगर’ वर्गातील लँडिंग शिप टँक प्रकारातील युद्धनौका आहे. या नौकेने तब्बल ३९ वर्षे राष्ट्रसेवा बजावली असून, १२ जानेवारी २०२४ रोजी ती भारतीय नौदलातून निवृत्त झाली. मे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या माध्यमातून १९ मे २०२६ रोजी ही नौका सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील निवती रॉक परिसरात समुद्रतळावर स्थापित करण्यात आली. ही नौका सुमारे २२ मीटर खोलीवर आहे.
‘एक्स-आयएनएस गुलदार’ची मजबूत पोलादी रचना आता कृत्रिम प्रवाळभित्ती म्हणून कार्य करणार आहे. त्यामुळे सागरी जैवविविधता, प्रवाळांची वाढ, मासेमारी संसाधने आणि पर्यावरणीय संतुलन यांना चालना मिळणार आहे. जेट्टीवरून स्पीडबोटद्वारे निवती रॉक येथे पोहोचल्यानंतर तेथील तरंगत्या व्यासपीठावर उतरून पर्यटकांना पाणबुडी किंवा स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून जहाजावरील प्रवाळ आणि विविध प्रकारच्या माशांचे निरीक्षण करता येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत व्रेक डायव्हिंग व पाणबुडी अनुभव, डिस्कव्हर स्कूबा डायव्हिंग (१२ मीटरपर्यंत), प्रमाणित डायव्हर्ससाठी मोहिमा (१८ मीटरपर्यंत), प्रगत डायव्हिंग अनुभव (३० मीटरपर्यंत), पाण्याखालील छायाचित्रण, सागरी शिक्षण आणि संशोधन अशा विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत.
फ्लोरिडा (अमेरिका) येथील यूएसएस ऑरिस्कन आणि ऑस्ट्रेलियातील एचएमएएस स्वॅन यांसारख्या जागतिक दर्जाच्या व्रेक डायव्हिंग स्थळांपासून प्रेरणा घेऊन विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प भारतातील पहिला जागतिक स्तरावरील पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळभित्ती पर्यटन उपक्रम ठरणार आहे.












