शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय महाराष्ट्रातील नामांकित विद्यालय- आ. रोहित पाटील

शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवलीमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी):–शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय हे अद्यावत व सुसज्ज अश्या सुविधांनी परिपूर्ण असलेले महाराष्ट्रातील नामांकित महाविद्यालय आहे, असे गौरवोद्गार आ. रोहित पाटील यांनी शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालय खरवते-दहिवलीमधील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याप्रसंगी काढले व आपल्या महाविद्यालयीन जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला.

 

शरदचंद्र पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवली येथील सांगली व कोल्हापूर भागातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा सांगली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

 

या कार्यक्रमास चिपळूण- संगमेश्वर विधान सभा मतदार संघाचे आ. शेखर निकम, तासगाव -कवठे महंकाळ मतदार संघाचे आ. रोहीत पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील , सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालीकेचे माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी व सह्याद्रि क्रीडा प्रबोधनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालया मार्फत स्थापन करण्यात आलेल्या सह्याद्रि अॅग्री अॅल्युम्नी असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व माजी विद्यार्थ्यांना संघटीत करणे, आजी व माजी विद्यार्थ्यांमध्ये मैत्रीचे ऋणानुबंध कायम ठेवणे हा उद्देश ठेवुन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

या कार्यक्रमास सुमारे दोनशे माजी विद्यार्थ्यी उपस्थित होते.या विद्यार्थ्यांना आमदार शेखर निकम यांनी संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, गेल्या पंचवीस वर्षापासुन अविरत पणे चालु असलेल्या महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच विविध आठवणींना उजाळा देत महाविद्यालयाच्या माध्यामातून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहीती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली व भविष्यात महाविद्यालयामध्ये सुधारित असे कृषि ए- आय सेंटर स्थापन करण्याचे आश्वासन दिले.

 

या कार्यक्रमास आमदार रोहीत पाटील यांनी देखील संबोधित करत स्वर्गीय माजी गृहमंत्री आर. आर. पाटील व आमदार शेखर निकम यांच्या मधील घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंध व आठवणीना उजाळा दिला. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय महाराष्ट्रातील नामांकित विद्यालय असल्याचे गौरवोद्गार काढले.

 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत आपुलकीने संवाद साधत मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन जिवनानंतर विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यशाची गाठलेली उंची पाहुन ते भावुक झाले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुमारे पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे साक्षीदार होता आले त्यांच्या सुख दुखात सहभागी होता आले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे असे प्रतिपादन केले .

 

अनिरुद्ध निकम यांनीदेखील विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली. अनेक यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार आमदार शेखर निकम, आमदार रोहीत पाटील, प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील व अनिरुद्ध निकम यांचे हस्ते करण्यात आले.

 

या वेळी सांगली जिल्ह्य़ातील कृषि क्षेत्रात काम करणारे विविध मान्यवर व पालक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार डाॅ.हरिश्चंद्र भागडे, विपुल घाग, प्रा.प्रसाद साळुंके सुनिल निकम व गोकुळ प्रिधनकर यांनी विशेष परिश्रम घेतले.