चिपळूण तालुक्यात ग्रामीण शिक्षणाचा पाया ढासळला; १० वर्षांत तब्बल ४३ जिल्हा परिषद शाळांना ‘टाळे’!

चिपळूण (वार्ताहर) : ग्रामीण भागातील शैक्षणिक आणि सामाजिक जीवनाचा मुख्य कणा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद शाळा अस्तित्वाच्या भीषण संकटाचा सामना करत आहेत. चिपळूण तालुक्यात गेल्या दहा वर्षांत तब्बल ४३ जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्याने त्यांना कायमचे टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा वाढता कल आणि घटती पटसंख्या यामुळे एकामागोमाग एक शाळा बंद पडत असल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पंचायत समिती चिपळूणच्या शिक्षण विभागाच्या यादीमध्ये बामणोली वणेवाडी, भिले भोई, भोम गवळवाडी, चिवेली शिबेवाडी, धामेली, केरे नं. १, मजरेकाशी उर्दू, केतकी भागणे, खेरशेत पुनर्वसन, कुंभार्ली धनगर, मालघर किलजे, नायशी उर्दू, ओवली सुकविल, शिरळ उर्दू, तिवडी नं. १, तिवरे कुंभारवाडी, वेहळे नं. ५, येगाव होडे, खेरशेत नं. १, कळवंडे तावडेवाडी, खोपड, कालुस्ते मुलांची उर्दू, तुरंबव वाडदे, तळवडे धनगर, कुटरे होडे, कुटरे नं. २, कुडप कुंभार, दुर्गवाडी नं. ५, कुडप नं. १, दुर्गवाडी नं. ३, असुडे नं. २, मजरे गोवळ, रामपूर नं. ३, चिपळूण नं. १, मोरवणे ओझर, दोणवली पवार, खेर्डी कातळ, मंजुत्री, गुढे लिंगाडी, उभळे नं. ३, पेढे कोष्टे आणि नागावे या शाळांचा समावेश आहे. इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची घसरती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थिसंख्या घटण्यामागे अनेक कारणे आहेत. आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, अशी पालकांची अपेक्षा वाढत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती अनुकूल असलेले पालक खाजगी शाळांना पसंती देत आहेत. परिणामी, जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशसंख्या कमी होत आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे खासगी शाळांचा खर्च परवडत नसलेल्या ग्रामीण कुटुंबांतील मुलांसाठी जिल्हा परिषद शाळा या आजही महत्त्वाचा आधार आहे. मात्र, गावातील शाळाच बंद झाल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूसऱ्या गावात जावे लागते. याचा विशेष त्रास लहान विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सहन करावा लागतो. शासनाकडून जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध शैक्षणिक सुविधा आणि उपक्रम राबविले जात असले, तरी विद्यार्थी संख्येतील घट रोखणे हे मोठे आव्हान आहे. गावातील शाळा टिकली तरच ग्रामीण शिक्षणाची परंपरा टिकेल. अन्यथा, भविष्यात आणखी शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे.