ठेकेदार कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
रत्नागिरी : मुंबई-गोवा आणि मिऱ्या-नागपूर या राष्ट्रीय महामार्गांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या जीवावर येत असल्याचा आरोप करत, या कामास जबाबदार असलेल्या ठेकेदार कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केली आहे. रत्नागिरी मनसेचे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांनी आज जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना निवेदन देऊन ही मागणी केली.
गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे, तसेच सध्या सुरू असलेल्या मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामामध्ये ठेकेदारांकडून योग्य ती उपाययोजना न केल्याने, अनेक पादचारी आणि नागरिक जीव गमावत आहेत. ठेकेदारांच्या मनमानी आणि बेपर्वाईमुळे रत्नागिरी तालुका आणि परिसरात अनेक निष्पाप लोकांचा बळी जात असल्याचे मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. शासनाद्वारे इतर नवीन महामार्गांसाठी भू-संपादन प्रक्रिया सुरू असली तरी, जर यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होणार असेल, तर असा विकास मनसेला मान्य नसल्याचे रुपेश जाधव यांनी स्पष्ट केले.
मनसेचा विकासात्मक कामांना विरोध नाही, परंतु या विकासाच्या नावाखाली जर सर्वसामान्य नागरिकांना जीव गमवावा लागत असेल, तर मनसे आपल्या पद्धतीने या विरोधात संघर्ष करण्यास तयार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अलीकडील काळात ईगल इन्फ्रास्ट्रक्चर, रवी इन्फ्रा लिमिटेड यांसारख्या अनेक ठेकेदारांच्या बेपर्वा कामकाजामुळे अनेक अपघात घडले आहेत.
याशिवाय, अवजड वाहनांकडून निवळी-गणपतीपुळे राज्य महामार्गावर सातत्याने अपघात होत असून, संबंधित पीडित व्यक्तींना किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोणतीही नुकसानभरपाई दिली जात नसल्याचा मनसेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
मनसेने या ठेकेदार कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, यापुढे या ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात हे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यास पात्र ठरवावेत, अशी स्पष्ट आणि आग्रही मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तत्परतेने संबंधितांची बैठक लवकरच आयोजित करण्याचे आश्वासन दिल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी निवेदन देताना मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्यासह तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, विशाल चव्हाण, विभाग अध्यक्ष सोमनाथ पिलणकर आणि सागर मयेकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.













