गणेशमूर्तिकलेच्या संवर्धनासाठी मूर्तिकारांची एकजूट!

मालवणात ‘जय गणेश मूर्तिकार कारागीर सेवा सहकारी संस्थे’ची स्थापना

१० नोव्हेंबरला मालवणात भव्य गणेशमूर्ती प्रदर्शन; जिल्ह्यातील नामांकित मूर्तिकारांचा सहभाग 

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशमूर्तिकलेला नवी ओळख मिळवून देण्यासाठी आणि पारंपरिक मूर्तिकारांच्या कलेला व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मालवणात महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकार व कारागीर बांधवांना संघटित व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘जय गणेश मूर्तिकार कारागीर सेवा सहकारी संस्था मर्यादित, मालवण’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी मालवण येथील हॉटेल विसावा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

 

गणेशमूर्ती निर्मिती हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पारंपरिक व्यवसाय असून, या कलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. मात्र बदलत्या काळात मूर्तिकारांना विविध आर्थिक, व्यावसायिक आणि बाजारपेठेशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांना एकत्र आणून त्यांच्या समस्या सोडविणे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, व्यवसायाला चालना देणे आणि पारंपरिक हस्तकलेचे जतन व संवर्धन करणे या प्रमुख उद्दिष्टांसाठी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

 

संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष समीर वर्दम, उपाध्यक्ष उमेश हडकर, सचिव संजय केळुसकर, खजिनदार नारायण माडये यांचा समावेश आहे. तसेच सदस्य म्हणून हेमंत रामाडे, सुनील केळुसकर, सुशांत तायशेट्ये, बाबुराव चव्हाण, सुधीर पवार, हर्षद घाडीगावकर, पंढरीनाथ नाचणकर, रविंद्र साळकर, सरिता पेडणेकर, जगन्नाथ कोयंडे, शरद गावडे, आप्पाजी चव्हाण, प्रकाश रेवडंकर, प्रकाश पवार, संदीप गावडे आणि संदीप कोळगे यांचा समावेश आहे.

 

पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी संस्थेची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आमचा पीओपी गणेशमूर्तींना विरोध नाही. मात्र सिंधुदुर्गातील पारंपरिक मूर्तिकारांच्या कलेला योग्य प्रोत्साहन मिळाले पाहिजे. त्यांच्या कलागुणांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध होऊन त्यांच्या हाताला वर्षभर काम मिळाले पाहिजे. येथील गणेशमूर्ती हीच सिंधुदुर्गची खरी ओळख आणि अभिमान बनली पाहिजे. मूर्तिकारांच्या कलाकृतींना राज्यासह देश-विदेशात पोहोचविण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 

१० नोव्हेंबरला मालवणात गणेशमूर्तिकलेचा भव्य आविष्कार!

 

सिंधुदुर्गच्या मूर्तिकलेतील वैविध्य, कलात्मकता आणि पारंपरिक कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या वतीने मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी मालवण शहरातील भरड येथील श्री दत्त मंदिरात भव्य गणेशमूर्ती प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री ११.३० वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील ४५ हून अधिक युवा आणि नामांकित मूर्तिकार या प्रदर्शनात सहभागी होणार असून, त्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक गणेशमूर्ती गणेशभक्त आणि कलाप्रेमींना पाहता येणार आहेत.

 

या प्रदर्शनाच्या माध्यमातून ‘सिंधुगणेश ब्रँड’ची संकल्पना अधिक व्यापक स्वरूपात पुढे आणण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ मूर्तिकार आणि मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनातील उत्कृष्ट पाच गणेशमूर्तींची निवड करण्यात येणार असून, संबंधित मूर्तिकारांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

 

मूर्तिकारांच्या कलापरंपरेच्या संवर्धनाचा निर्धार

 

गणेशमूर्ती निर्मिती ही केवळ धार्मिक परंपरेशी निगडित कला नसून अनेक कारागीर कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन आहे. या पारंपरिक व्यवसायाला आधुनिक बाजारपेठेची जोड मिळावी, नव्या पिढीतील मूर्तिकारांना प्रोत्साहन मिळावे आणि स्थानिक कलावंतांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविता यावे, यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. मूर्तिकारांच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे पाठपुरावा करण्यासह शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही संस्था कटिबद्ध राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समृद्ध गणेशमूर्तिकलेचा गौरव वाढविणाऱ्या या प्रदर्शनाला मालवण शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील गणेशभक्त, कलाप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी व स्थानिक मूर्तिकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ‘जय गणेश मूर्तिकार कारागीर सेवा सहकारी संस्थे’च्या वतीने करण्यात आले आहे.