श्रावणातील पहिल्या सोमवारी खेड शहरात शोभायात्रा व शांती यात्रा

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय व विश्व हिंदू परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

खेड (प्रतिनिधी) – श्रावण महिन्याच्या पावन सुरुवातीच्या निमित्ताने खेड शहरात शिवबाबांच्या स्मरणार्थ भव्य शोभायात्रा व शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा सोमवार, २८ जुलै रोजी आयोजित केली जाणार आहे.
सकाळी महाड नाका येथील ब्रह्माकुमारीज केंद्रापासून यात्रेला सुरुवात होणार असून, शिवबाबांचे ध्वज आणि मधुर गीतांच्या गजरात शांततेच्या वातावरणात शोभायात्रा मार्गस्थ होईल. छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही वेळ विश्रांती घेऊन यात्रेतील भक्तांना दर्शनाची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर ही यात्रा वाणीपेठ, सोनार आळी, तीनबत्ती नाका, तळ्याची वाकण मार्गे पुन्हा शिवाजी महाराज चौकात परत येईल.
या पवित्र शोभायात्रेत सर्व धर्मातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ब्रह्माकुमारी गीता बहन आणि विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा प्रभारी बिपिन पाटणे यांनी केले आहे. इच्छुक महिलांना कलश घेऊन यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवबाबा हे सर्व मानव आत्म्यांचे पिता असून त्यांची शिवपिंडीच्या रूपात पूजा केली जाते. ईश्वर प्रेमाचा व सत्य ज्ञानाचा संदेश खेडवासीयांपर्यंत पोहोचवणे, हाच या यात्रेचा मुख्य हेतू आहे. शांतता, आध्यात्मिक उन्नती आणि भक्तिभाव जागवणाऱ्या या यात्रेमुळे खेड शहरात पावन आणि अध्यात्मिक वातावरण निर्माण होणार आहे.