काका-काकीच्या खून प्रकरणातील संशयित प्रतीक शिगमला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

रत्नागिरी ः प्रतिनिधी
लांजा तालुक्यातील व्हेळ सडेवाडी येथे काका-काकीचा खून करणार्‍या संशयिताला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. प्रतीक चंद्रकांत शिगम (26, रा. व्हेल सडेवाडी ता. लांजा) असे संशयिताचे नाव आहे. प्रतीक याला न्यायालयाच्या सुनावणीच्या तारखांव्यतिरिक्त न्यायालयाकडून मनाई करण्यात आली आहे. रत्नागिरी लोकअभीरक्षक कार्यालयाकडून प्रतीक याच्या जामिनासाठी प्रस्ताव पाठवला होता, अशी माहिती रत्नागिरी लोकअभीरक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अश्विनी भोबे यांनाी प्रतिकच्या जामिन अर्जावर निकाल दिला. गुन्ह्यातील माहितीनुसार, लांजा तालुक्यातील व्हेळ सडेवाडी येथे 9 मार्च 2019 मध्ये प्रतीक याने गाण्यांच्या आवाजावरुन झालेल्या वादातून काका एकनाथ धकटू शिगम (55) व वनिता एकनाथ शिगम (50, रा. दोन्ही व्हेळ सडेवाडी, ता. लांजा) यांचा दगड डोक्यात मारुन खून केला, असा आरोप प्रतीक याच्यावर ठेवण्यात आला आहे.
व्हेळ सडेवाडी येथे 9 मार्च 2019 रोजी सकाळी प्रतीक याने घरामध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली होती. यावेळी काका एकनाथ यांनी गाण्यांचा आवाज कमी कर, असे सांगितले. यावरुन प्रतीक व काका एकनाथ यांच्यात वाद झाला होता. यावेळी प्रतीक हा काका एकनाथ याच्या अंगावर धावून गेला. तसेच दगडाने मारुन गंभीर जखमी केले. यावेळी एकनाथ यांची पत्नी वनिता ही पतीच्या बचावासाठी पुढे आली असता तिलाही प्रतीक याने दगडाने मारुन जखमी केले. दगडाचे घाव वर्मी लागल्याने एकनाथ व त्यांची पत्नी वनिता यांचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. काका-काकीचा खून केल्यानंतर प्रतीकने जंगलाच्या दिशेने पळ काढला होता. यानंतर गावकर्‍यांनी सुमारे 3 किलोमीटर पाठलाग करून प्रतीकला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. एकनाथ व त्यांची पत्नी वनिता यांचा खून केल्याप्रकरणी प्रतीकविरुद्ध भादंवि कलम 302 नुसार लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील 6 वर्षापासून प्रतीक हा जेलमध्ये होता. रत्नागिरी विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत लोक अभीरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभीरक्षक अ‍ॅड. अजित वायकूळ यांनी प्रतीकच्या जामिनासाठी प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयातील विधी सेवा समितीकडे पाठवला होता उच्च न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरण समितीचे अ‍ॅड. अजित सावगावे यांनी प्रतीकची बाजू उच्च न्यायालयापुढे मांडली. उच्च न्यायालयाने अटी-शर्थीसह प्रतीकला जामीन मंजूर केला.