नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचा भाऊ थोडक्यात बचावला!!
तालुक्यात खळबळ
दोडामार्ग प्रतिनिधी
दोडामार्ग शहरातील सुरुचीवाडी, कसई दोडामार्ग येथे रविवारी एका निवासी घराच्या आवारात दारू पिण्यास आणि अश्लील कृत्य करण्यास मज्जाव केला म्हणून एका अनोळखी तरुणाने जिम चालकाला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की,कसई दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचा भाऊ (सुरुचीवाडी) येथील रहिवासी आणि जिम चालक रोहन सुभाष चव्हाण (वय ३७) हे रविवारी आपल्या घरी होते. यावेळी त्यांच्या घरासमोरील इमारतीच्या बांधकाम सुरू असलेल्या कंपाऊंडमध्ये एक अनोळखी तरुण दारू पीत उभा असल्याचे त्यांना दिसले. तसेच त्याच्यासोबत असलेली एक मुलगी त्या ठिकाणी एका कोपऱ्यात लघुशंका करत असल्याचे चव्हाण यांच्या निदर्शनास आले.
हे निवासी क्षेत्र असल्याने आणि तिथे चव्हाण यांचे कुटुंब राहत असल्याने, त्यांनी त्या तरुणाला येथे अशी कृत्ये करू नका, अशी विचारणा केली. याचा राग येऊन त्या अनोळखी तरुणाने चव्हाण यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. हा वाद सुरू असतानाच, बाजूलाच असलेल्या टीव्हीएस (TVS) शोरूमचे मॅनेजर शुभम मुळगांवकर तिथे आले. चव्हाण आणि मुळगांवकर यांनी त्या तरुणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो शिवीगाळ करत गेटच्या बाहेर गेला.
त्यानंतर चव्हाण व मुळगांवकर हे दोघे आत जात असताना, त्या अनोळखी इसमाने आपल्या गाडीतून चाकू काढला आणि तो चव्हाण व मुळगांवकर यांच्यावर वार करण्याच्या उद्देशाने त्यांच्या मागे धावून आला. तसेच त्याने दोघांनाही अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरून दोघेही बाजूला पळाले. यानंतर तो अनोळखी तरुण त्याच्या महिला मैत्रिणीसह ‘स्वीफ्ट’ कार (क्र. GA 07 E 6051) मधून घटनास्थळावरून पसार झाला.
या धक्कादायक प्रकारानंतर रोहन चव्हाण यांनी शुभम मुळगांवकर व इतर मित्रांसह तात्काळ दोडामार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल दिली आहे . पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया योग्य त्या कलमा अतर्गत उशिरा सुरु होती या प्रकरणी संशयित आरोपी आणि त्या कारचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास दोडामार्ग पोलीस करत आहेत.













