शिरगाव हायस्कूल व शिरगाव क्रिकेट अकॅडमीचा अभिमान
शिरगाव (प्रतिनिधी) – देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल व शिरगाव क्रिकेट अकॅडमीची विद्यार्थिनी, इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणारी आर्या अभिजित जाधव हिची अंडर-19 T20 महाराष्ट्र संघासाठी होणाऱ्या निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेसाठी आर्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे रवाना झाली आहे.
या निवड चाचणीत आर्याची खेळी उत्तम ठरल्यास तिला थेट महाराष्ट्र राज्य संघात स्थान मिळणार आहे. त्यामुळे शाळा, गाव आणि अकॅडमीसाठी हा मोठा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
शिरगाव येथील आर्या हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर या टप्प्यापर्यंत मजल मारली आहे. तिच्या या यशस्वी वाटचालीसाठी संपूर्ण शिरगावकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आर्याच्या यशामध्ये शिरगाव क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक श्री. सुधीर साटम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आर्याने आपली खेळी अधिकाधिक विकसित केली आहे.
तिच्या निवडीबद्दल शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष श्री. अरुण कर्ले व सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच शिरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एन. आतार, शाळा समितीचे चेअरमन व पदाधिकारी,प्रशिक्षक सुधीर साटम, सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.










