सावंतवाडीत २५ जुलै रोजी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी ‘रुद्रयाग’ आणि ‘रक्षासूत्र बंधन’

ना. नितेश राणे तसेच आमदार निलेश राणे यांची विशेष उपस्थिती 

विठ्ठल मंदिरात दुपारी तीन वाजता होणार यज्ञाचा शुभारंभ 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या गोतस्करी आणि ‘लव्ह जिहाद’ च्या घटनांविरोधात समाजात जनजागृती करण्यासाठी आणि हिंदु धर्माच्या रक्षणासाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने एक महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येत्या २५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात ‘रुद्रयाग’ आणि ‘रक्षासूत्र बंधन’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला पालकमंत्री

ना. नितेश राणे, आमदार नीलेश राणे, गोरक्षक दादा मोडक, आणि अधिवक्ता देवदास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कृष्णा धुळपणावर, तालुका संयोजक साईराज नार्वेकर, आणि गोरक्षक जिल्हाध्यक्ष दिनेश गावडे यांनी दिली.

आयोजकांनी जिल्ह्यातील बजरंग दलाच्या सर्व कार्यकर्त्यांसह बहुसंख्य हिंदू बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. सकल हिंदु समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कृष्णा धुळपणावर, गोरक्षक जिल्हाध्यक्ष दिनेश गावडे, सावंतवाडी संयोजक साईराज नार्वेकर आणि सहसंयोजक जितेंद्र रायका यांनी हे आवाहन केले.

या कार्यक्रमादरम्यान ३५ वर्षांखालील युवकांना बजरंग दलामध्ये सामावून घेण्यात येणार आहे. जास्तीत जास्त हिंदू युवकांनी या ‘परमेश्वरी कार्यात’ सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बजरंगी तेजस मेस्त्री, संकल्प धारगळकर, अखिल मांजरेकर, धनु मोरजकर हे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.