रत्नागिरी – कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक अंतर्गत कार्यरत भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी यांच्या वतीने संस्कृत महोत्सवाच्या निमित्ताने तीन निःशुल्क सात दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व अभ्यासक्रम ०१ ऑगस्ट ते ०७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत, सोमवार ते शनिवार दरम्यान दररोज सायंकाळी आयोजित करण्यात येणार आहेत.
संध्याकाळी ४.०० ते ४.४५ या वेळेत ‘गीता-वेदांत परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ घेण्यात येणार असून, यामध्ये भगवद्गीता व भारतीय तत्त्वज्ञानातील निवडक संकल्पनांचा प्राथमिक परिचय दिला जाईल.
‘स्तोत्र पठण वर्ग’ देखील याच वेळेत होणार असून, यात गणेशपंचरत्न स्तोत्रम्, शिवाष्टकम्, विष्णुशोडषनामस्तोत्रम्, पांडुरंगाष्टकम्, नवग्रहस्तोत्रम्, सरस्वतीनामस्तोत्रम् आणि गुर्वाष्टकम् ही लोकप्रिय स्तोत्रे शिकवली जाणार आहेत.
त्यानंतर सायंकाळी ४.४५ ते ५.३० या वेळेत ‘संस्कृत भाषा परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ पार पडणार असून, यात संस्कृत सुभाषिते, संभाषण, संस्कृत साहित्य आणि संस्कृत कथा यांचा प्राथमिक अभ्यास केला जाणार आहे.
तीन्ही अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सहभागींस अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. हे सर्व अभ्यासक्रम पूर्णतः निशुल्क असून offline पद्धतीने रत्नागिरीतील अरिहंत मॉल, तिसरा मजला, बसस्थानकाजवळील भारतरत्न डॉ. पां. वा. काणे उपकेंद्र येथे पार पडणार आहेत.
नोंदणीसाठी इच्छुकांनी https://forms.gle/qcqPHuDqnQSm2Wda7 या लिंकवर नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी प्रा. अविनाश चव्हाण (८३९०८५४९२६) व स्वरूप काणे (७२१९०५४०९७) यांच्याशी संपर्क साधावा.
या उपक्रमांविषयी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी, संस्कृतप्रेमींनी आणि तत्त्वज्ञान व स्तोत्रांमध्ये रस असणाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.












