कोकण आयुक्त रुबल अगरवाल यांची राजापूर नगर परिषदेला भेट

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत कामाची केली पहाणी

राजापूर प्रतिनिधी: विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत रत्नागिरी जिल्हयात पहाणी दौऱ्यावर आलेल्या कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी गुरूवारी राजापूरात भेट दिली. यावेळी त्यांनी राजापूर नगर परिषदेला भेट देत नगर परिषदेकडून शहरातील विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत करण्यात आलेल्या मतदार यादीची पहाणी केली. यावेळी राजापूरच्या नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांनी अग्रवाल यांचे स्वागत केले.
कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत गेले दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी रत्नागिरी जिल्हयात खेड व चिपळूण तालुक्यांना भेट दिली. तर बुधवारी सायंकाळी रत्नागिरीतही त्यांनी भेट दिली. गुरूवारी त्या राजापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी राजापूर नगर परिषदेला भेट दिली. नगर परिषदेच्या मतदार सहाय्यक कक्षाला भेट देत त्यांनी नगर परिषदेकडून विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत कशा प्रकारे काम करण्यात आले आहे याची प्रत्यक्ष पहाणी केली व माहिती घेतली.
यावेळी नगराध्यक्षा एड. खलिफे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अपर आयुक्त फरोग मुकादम, सिंधुदुर्ग अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल कबनुरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, राहुल गायकवाड, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, प्रांताधिकारी विश्वजित गाताडे, तहसीलदार विकास गंबरे, लांजा तहसीलदार प्रियंका ढोले, राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार, कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.