नेवरे येथे भरधाव कारने दुचाकीला धडक; पुणे येथील तरुणीसह दोघे जखमी

रत्नागिरी: भरधाव वेगात कार चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले. ही घटना बुधवार, २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नेवरे गावापुढील हॅलीपॅडजवळ घडली.
अभय अभिमन्यू शिरगावकर (५५, रा. निवेंडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे. या अपघातात अथर्व जगदीप पाटील (१९, मूळ रा. सातारा, सध्या रा. रत्नागिरी) आणि अर्चना कृष्णा (२०, मूळ रा. पुणे, सध्या रा. रत्नागिरी) हे दोघे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी अभय शिरगावकर हे त्यांच्या ताब्यातील झेस्ट कार (एमएच-०८-एजी-३८१२) घेऊन निवेंडी ते रत्नागिरी असे येत होते. त्याचवेळी अथर्व पाटील आपल्या दुचाकीवर (एमएच-०८-एडी-१९५८) त्यांची मैत्रीण अर्चना हिला घेऊन गणपतीपुळेच्या दिशेने जात होता. नेवरे गावापुढील हॅलीपॅडजवळ दोन्ही वाहने समोरासमोर आली असता, कार चालक अभय शिरगावकर यांचा कारवरील ताबा सुटला. त्यांनी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले आहे. ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.