रत्नागिरी : मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२६१९) ची धडक लागून एका मादी बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २४ जुलै २०२५ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी येथील आरटीओ कार्यालयाजवळील रेल्वे पुलाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे ट्रॅक ओलांडताना बिबट्याला भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेची धडक बसली. या अपघातात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे पोलीस रत्नागिरीचे पृथ्वीराज चव्हाण यांनी तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच, प्रकाश सुतार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह रात्री ११:०० वाजता घटनास्थळी धाव घेतली.
पाहणी केली असता, मृत बिबट्याचा मृतदेह ट्रॅकशेजारी पडलेला आढळला. अपघाताची भीषणता इतकी होती की, बिबट्याची मान धडावेगळी झाली होती, खालचा जबडा तुटला होता आणि उजवा डोळा बाहेर आला होता. मृत बिबट्या मादी जातीचा असून, तिचे वय साधारण दोन ते तीन वर्षांच्या दरम्यान असल्याचे वनविभागाने सांगितले.
वनविभागाने तात्काळ मृत बिबट्याचा ताबा घेतला. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई आणि सहायक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती प्रियंका लगड यांना या घटनेची माहिती देण्यात आली.
आज, २५ जुलै २०२५ रोजी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित रणभारे यांच्यामार्फत मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर, बिबट्याचे मृत शरीर सर्व अवयवांसहित जाळून नष्ट करण्यात आले.
या बचावकार्यात रेल्वे पोलीस विभागाचे सतीश विधाते (पीआयआरपीएफ), आर.एस. चव्हाण (एएसआय), प्रवीण कांबळे (कॉन्स्टेबल), अमर मुकादम, कमलेश पाल, व्ही.एस. पवार, तसेच निसर्गप्रेमी रोहन वारेकर, महेश धोत्रे, आशिष कांबळे, प्रेम यादव उपस्थित होते. वनविभागाकडून परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल पाली न्हानू गावडे आणि वनरक्षक रत्नागिरी शर्वरी कदम यांनीही सहभाग घेतला. ही संपूर्ण कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई आणि सहायक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई यांनी अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.











