कचरा डेपो स्थलांतरित करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन हवेत

कुवे ग्रामस्थ संतप्त, १५ ऑगस्ट रोजी करणार लाक्षणिक उपोषण
संतोष कोत्रे

लांजा -: त्रासदायक ठरणारा कचरा डेपो पंधरा दिवसात स्थलांतरित करतो असे लांजा न.पं. मुख्याधिकारी यांनी दिलेले लेखी आश्वासन हवेत विरल्याने कुवे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून या विरोधात येत्या १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे .
याबाबतचे निवेदन आज शुक्रवारी १ ऑगस्ट रोजी लांजा तहसीलदारांसह पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे मुख्याधिकारी नगरपंचायत लांजा यांना देखील सादर करण्यात आले आहे .
या निवेदनात म्हटले आहे की, कुवे संघर्ष समितीच्या वतीने लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना २७ जून रोजी निवेदन सादर केले होते. कुवे येथील शासकीय जागेत गेल्या दोन वर्षांपासून टाकण्यात येणारा कचरा हा लोकांना त्रासदायक ठरत आहे. प्रदूषण त्याचप्रमाणे कुत्र्यांचा वाढलेला उपद्रव आणि पाणी प्रदूषणाचा धोका इत्यादी बाबी त्या निवेदनात नमूद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्रासदायक ठरणार हा कचरा डेपो तातडीने स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी देखील कुवे संघर्ष समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती .
कुवे संघर्ष समिती आणि ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिनांक १४ जुलै रोजी संघर्ष समितीला पत्र देऊन पुढील पंधरा दिवसात कचरा डेपो स्थलांतरित केला जाईल असे सांगितले होते. मात्र ३१ जुलै पर्यंत देखील कचरा डेपो स्थलांतरित बाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. आणि हा कचरा आजही कुवे येथे टाकण्यात येत आहे. त्यामुळे कुवे संघर्ष समिती आणि ग्रामस्थांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून नगर पंचायत प्रशासनाच्या कारभाराविरोधात येत्या १५ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. लांजा तहसील कार्यालयासमोर हे उपोषण करणार असल्याचे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे .
या उपोषणाबाबतचे निवेदन सादर करताना कुवे संघर्ष समितीचे मदन राडये, अशोक गुरव, दिनानाथ सुर्वे, परवेश घारे ,संतोष दुडये, संतोष निवळे संदीप गुरव आदींसह अन्य ग्रामस्थांच्या उपस्थिती होते.