वाटद एमआयडीसी होण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ सरसावले

26 जुलै रोजी विशेष बैठकीचे आयोजन

रत्नागिरी :
प्रस्तावित वाटद एमआयडीसी होण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ सरसावले असून, शनिवार 26 जुलै रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या तयारीसाठी गुरुवारी खंडाळा येथे बैठक पार पडली. यात एमआयडीसीअंतर्गत येणार्‍या ग्रामपंचायतींचे सरपंच, गावकर, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे एमआयडीसी प्रस्तावित असून, भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी नुकतेच सर्वेक्षण व हरकतींवर सुनावण्या घेण्यात आल्या. यानंतर काही ग्रामस्थांनी या एमआयडीसीला विरोध करण्यासाठी वाटद खंडाळा परिसरात मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर एमआयडीसीला पाठिंबा असणार्‍या ग्रामस्थांची संख्या मोठी असल्याने या ग्रामस्थांनी आता पाठिंब्यासाठी बैठकीचे आयोजन केले असून, या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत यांना निमंत्रित केले आहे.
शनिवारी होणार्‍या या बैठकीच्या नियोजनासाठी गुरुवारी खंडाळा येथे बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबू म्हाप, माजी जि.प. सदस्य बाबू पाटील, परिसरातील सरपंच, मच्छीमार यांच्यासह जवळपास दोनशे ते अडीचशे प्रमुख ग्रामस्थ, गावकरही उपस्थित होते. त्यामुळे पाठिंबा देण्यासाठी भव्य बैठक आयोजित करुन विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचा चंग ग्रामस्थांनी बांधला आहे.