साळशी येथे गवारेड्यांकडून भात पिकाचे मोठे नुकसान

शिरगाव (प्रतिनिधी) –   देवगड तालुक्यातील साळशी (सरमळे वाडी) येथील त्रिपूर शेतामध्ये गवारेड्यांनी रात्रीच्या वेळी धाड घालून भातपीक खाल्ले आणि पायदळी तुडवत मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. या घटनेमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

साळशी येथील शांताराम मिराशी या शेतकऱ्यांनी महागडी खते, निवडक बियाणे आणि परिश्रमाने त्रिपूर शेतात भातपीक उभे केले होते. मात्र गवारेड्यांनी एका रात्रीत पीक उध्वस्त केले. काही दिवसांपूर्वीही या त्रिपूर शेतातील भात शेतीचे अशाच प्रकारे नुकसान झाले होते. सततच्या त्रासामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे परिसरातील अनेक शेतकरी शेतीपासून दूर जात आहेत. वनविभागाने तातडीने लक्ष घालून गवारेड्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे