कोंबड्यांच्या पोल्ट्रीत शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने यशस्वीपणे केले जेरबंद !

संगमेश्वर  – संगमेश्वर तालुक्यातील मौजे तुरळ (सांगडेवाडी) येथील मधुकर चव्हाण यांच्या घराच्या मागील कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये 27 जुलै 2025 रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास बिबट्या शिरल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख यांना दिली. वनविभागाने तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत, संपूर्ण रेस्क्यू टीमसह पिंजरा व आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी धाव घेतली. पोल्ट्रीमध्ये बिबट्या अडकलेला असल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक संगमेश्वर यांच्याशी संपर्क साधून पोलीस कर्मचारी बोलावण्यात आले व त्यांनी गर्दी नियंत्रित केली.

रेस्क्यू दरम्यान पोल्ट्री फार्मभोवती शेडनेट लावण्यात आले व मुख्य दरवाजाजवळ पिंजरा बसवण्यात आला. पोल्ट्रीतील चार कंपार्टमेंटमध्ये फिरणाऱ्या बिबट्याला अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.

या मोहिमेत परीक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री. प्रकाश सुतार, परिमंडळ अधिकारी श्री. न्हाणू गावडे, तसेच विविध वनपरिक्षेत्रातील वनरक्षक व कर्मचारी, प्राणीमित्र महेश धोत्रे, निसर्गमित्र अनुराग आखाडे यांचे सहकार्य लाभले. पोलिस विभागाचे निरीक्षक श्री. चव्हाण, उपनिरीक्षक गावित व अन्य कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

बिबट्याची पशुवैद्यकीय तपासणी कडवई येथील डॉ. बेलोरे यांनी केली. सदर मादी बिबट्या सुमारे अडीच ते तीन वर्षांची असून पूर्णतः तंदुरुस्त असल्याचे निष्पन्न झाल्याने तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नागरिकांनी अशा घटनांमध्ये वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 वर संपर्क साधण्याचे आवाहन श्रीमती देसाई यांनी केले आहे.