फोंडाघाट महाविद्यालयात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 कार्यशाळा संपन्न
फोंडाघाट| कुमार नाडकर्णी–
कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 कार्यशाळा घेण्यात आली. याअंतर्गत फोंडाघाट व पंचक्रोशीतील विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना स्वच्छतेचे जीवनातील महत्व व ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात येणारे स्वच्छतेचे विविध उपक्रम याबाबतची सविस्तर माहिती दिली. पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून नागरिकांना कचराकुंड्या पुरवण्यात आल्या आहेत. त्याच्या माध्यमातून ओला व सुका कचरा स्वतंत्र संकलित करून तो ग्रामपंचायतीकडे जमा करण्यात येतो. त्या कचऱ्याचे बचत गटाद्वारे व्यवस्थापन करून त्यातून गांडूळ खत निर्मिती केली जाते. तर प्लास्टिक कचरा संकलित करून तालुकास्तरावर त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रकारे संपूर्ण कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते.
तसेच सर्व ग्रामपंचायतीचे सध्या सर्वेक्षण सुरू आहे, त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी भाग घेऊन आपापल्या ग्रामपंचायत सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पुरंधर नारे यांच्या अध्यक्षतेखाली व पाणी व स्वच्छता विभागाच्या कणकवली तालुका समन्वयक नम्रता हरकुळकर (कुडाळकर), मार्गदर्शक यश घाडीगावकर यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली.
महाविद्यालयातील प्रियांका मोंडकर, संजना सांडीम, सायली पेडणेकर, चेतन डोंगरे, साहिल फोपे, पार्थ गिरकर यांच्यासह इतर विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यासाठी उपस्थित होते.











