रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज, मंगळवार, २९ जुलै २०२५ रोजी सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी १४.०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याभरात एकूण १२६.७७ मिलिमीटर पाऊस पडल्याचे हवामान विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.
आज सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात २६.१४ मिलिमीटर इतका नोंदवला गेला. त्याखालोखाल मंडणगड तालुक्यात १५.५० मिमी, लांजा तालुक्यात १६.६० मिमी, खेड तालुक्यात १३.५७ मिमी आणि संगमेश्वर तालुक्यात १८.७५ मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये चिपळूण येथे ११.३३ मिमी, राजापूरमध्ये १२.०० मिमी, रत्नागिरीत ६.८८ मिमी तर गुहागरमध्ये सर्वात कमी ६.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मॉन्सून सक्रिय असल्याने गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. आजच्या पावसाने शेती कामांना गती मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











