२५ वर्षांपासूनची मागणी प्रलंबित हे दुर्दैव- शौकत मुकादम
चिपळूण (प्रतिनिधी) : कोकण रेल्वेने रेल्वेतून मोटार आणण्याची नवीन योजना आखली आहे, परंतु मोटार उतरण्याचा रॅम चिपळूण रेल्वे स्टेशनला नसल्यामुळे रेल्वेतून येणाऱ्या मोटारी चिपळूणमध्ये उतरल्या जाणार नाही. त्यामुळे या योजनेचा तालुक्याला फायदा नाही ही दुर्दैवी बाब आहे. गेली २५ वर्षे चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्टेशनवर रो-रो मधुन येणाऱ्या लोडच्या गाडया उतरण्यासाठी रॅम बांधण्यात यावा, अशी मागणी गेली २० ते २५ वर्ष करीत आहोत. परंतु या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
रो-रो गाडीतून येणाऱ्या ट्रक मधला माल हा रत्नागिरी मध्ये उतरविला जातो. यामध्ये सिमेंट, धान्य वगैरेची वाहतुक केली जाते, ती रत्नागिरीकडे पुढे नेवुन पुन्हा ट्रकने संगमेश्वर, गुहागर, चिपळूण, खेड, मंडणगड, दापोली याकडे वाहतुक केली जाते. त्यामुळे लोकांना नाहक भुर्दंड बसतो. चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्टेशनसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची जागा घेऊ नका असे आमचे म्हणणे आम्ही मांडले होते. तेव्हा रेल्वे प्रशासनाने कोकण अन्याय निवारण समितीला लेखी पत्र देवून याठिकाणी सर्व गाडयांना थांबे, रेल्वेमधून लोड उतरण्याचा रॅम, व विविध सुविधा चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्टेशनवर उपलब्ध केल्या जातील म्हणून आम्ही मोठया प्रमाणात जागा घेत आहोत असे आम्हाला सांगितले गेले होते. अशी माहिती कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, श्रीमंतांची सेवा, गरीबांना आश्वासनाचा मेवा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण रेल्वेला प्रवाशांची संख्या जबरदस्त वाढली आहे तरीसुद्धा रेल्वेमध्ये बसायला जागा मिळत नाही. प्रवाशांसाठी नविन जादाच्या गाडया सुरु करा. विशेष म्हणजे चिपळूणसाठी विशेष गाडी चिपळूण-दादर पॅसेंजर सुरु करावी अशी आमची अनेक वर्षाची मागणी प्रलंबित आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा विचार करता जादाच्या गाड्या सुरु कराव्यात व रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गाड्या सुरु करुन व्यवस्था करावी, अशीही मागणी मुकादम यांनी केली आहे. रेल्वेतून मोटार आणून रत्नागिरीमध्ये उतरवुन पुन्हाः चिपळूणच्या दिशेने पाच तालुक्यामध्ये रस्त्याने गाडया आणणे आर्थिकदृष्टा परवडणारे नाही, तर चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्टेशनवर गाडया उतरविण्यासाठी रॅम बांधण्यात यावा, अशीही मागणी मुकादम यांनी केली आहे.












