राजापुरातील आरोग्य विषयक सेवा सुविधांचा प्रश्न ऐरणीवर
चांगल्या आरोग्य सेवा सुविधा पुरविण्याच्या केवळ पोकळ गप्पाच
राजापूर (प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील आरोग्य विषयक सेवा सुविधांच्या उणीवांबाबत कायमच चर्चा होते. सुपरस्पेशालीटी हॉस्पीटलसह आरोग्य सेवा सुधारण्याची आश्वासने दिली जातात, व मोठया गप्पाही मारल्या जातात. पण प्रत्यक्षात मात्र राजापूर तालुक्यातील आरोग्य विषयक सेवा सुविधांची अवस्था किती भयावह आहे हे वेळीच उपचार न झाल्याने रूग्णांचे होणारे मृत्यु पाहिल्यावर स्पष्ट होते. गेल्या तीन महिन्यात राजापूर तालुक्यात सर्पदंश झाल्यानंतर वेळीच व योग्य उपचार न मिळाल्याने ग्रामीण भागातील दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या या मृत्युमुळे त्यांचे कुटुंब उघडयावर पडले आहे. २१ व्या शतकात वावरत असताना आणि विकासाच्या व प्रगतीच्या दिशेने झेपावत असताना अशा प्रकारे सर्प दशांमुळे उपचाराअभावी होणारे मृत्यु ही निश्चितच राजापूरकरांसाठी शरमेची बाब आहे.
आपले प्रतिनिधीत्व केलेले व करणारे लोकप्रतीनिधी, सोशल मिडावर विकासाच्या पोकळ गप्पा मारणारे राजकिय पुढारी व स्वंयंघोषीत सामाजिक कार्यकर्ते याचा कधी विचार करणार आहेत की नाही असा खडा सवाल आता जनतेतुन उपस्थित केला जात आहे. अशा प्रकारे उपचाराअभावी व वेळेत उपचार न मिळाल्याने होणाऱ्या मृत्युमुळे आरोग्य विभागाची आणि तालुक्याची लक्तरे वेशीवर येत आहेत.
तालुक्यात दोन ग्रामीण रूग्णालये, ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ४८ आरोग्य उपकेंद्रे हीच ग्रामीण भागातील जनतेची उपचारांची आशास्थाने आहेत. मात्र या ठिकाणी असलेला अपुरा कर्मचारी वर्ग, औषधांचा तुटवडा आणि अन्य त्रुटींचा विचार केला तर कोटयावधी रूपये खर्चुनही काहीच उपयोग नाही अशी राजापुर तालुक्यात अवस्था आहे. कधी कधी तर श्वानदंशावरील लसही अनेक ठिकाणी उपलब्ध नसते अशा रूग्णांच्या व नातेवाईकांच्या तक्रारी येतात, मात्र अशा अशा अपुऱ्या सेवा सुविधांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात याकडे आपण कधी गांभीर्याने पहाणार आहोत की नाही हाच खरा प्रश्न आहे. यात बदल झाला नाही तर भविष्यातही अशाच प्रकारे अनेकांना आपले प्राण गमावावे लागतील.
तालुक्यातील आंबोळगड येथील सुविधा सुगंध वाडेकर या महिलेला सर्पदंश झाल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने १७ एप्रिल २०२५ रोजी मृत्यु झाला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घराशेजारी काम करत असताना सर्पदंश झाला होता. यावेळी शेजारी आणि काही ग्रामस्थांनी जवळचे रुग्णालय म्हणून जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र तेथे कोणी कर्मचारी किंवा डॉक्टर उपलब्ध नव्हते. म्हणून मग त्यांना धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्या ठिकाणी किरकोळ प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रत्नागिरी येथे नेण्यास सांगण्यात आले. यामध्ये बराच कालावधी निघून गेल्याने आणि वेळेवर उपचार न झाल्याने रत्नागिरी येथे हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यु झाला. वाडेकर यांच्या मृत्युमुळे त्यांचे कुटुंब उघडयावर पडले.
तर अशाच प्रकारे शेतात बेनणी करत असताना सर्पदंश झाल्याने तालुक्यातील पडवे गावातील हर्षदा हरेश बाईत (वय ३५, रा. तांबे पाखाडी, पडवे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हर्षदा या त्यांच्या जाऊ योगिता संतोष बाईत यांच्यासोबत बेनणी करत असताना दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हाताच्या बोटाला फुरसे जातीच्या सापाने दंश केला. घटनेनंतर योगिता आणि गावकऱ्यांनी तातडीने त्यांना राजापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
उपचार सुरू असतानाच हर्षदा बेशुद्ध पडल्या आणि तब्येत खालावत गेल्याने त्यांना पुढील उपचारासाठी १०८ अॅम्बुलन्सद्वारे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी ३ वाजून ५१ मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले.
तालुक्यात अशा प्रकारे सर्पदंशाने या दोन महिलांचा झालेला मृत्यु ही निश्चितच अत्यंत दुदैवी अशी घटना आहे. या महिलांना वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचे प्राण निश्चितच वाचले असते.
या एकूणच परिस्थितीवरून राजापुर तालुक्यातील आरोग्य सेवेतील गैरसोयी आणि उणीवा प्रकर्षाने पुढे आल्या आहेत. रस्ते, विज, पाखाडया यापेक्षाही विकासाच्या वेगळया संकल्पना आहेत. चांगली दळणवळणची साधने हवीतच पण त्याचबरोबर चांगली आरोग्य सेवा देखील आवश्यक आहे. सर्पदंश सोडा पण अगदी सोनोग्राफी करण्यापासून ते गर्भवती महिलांना प्रसुतीसाठीही रत्नागिरी गाठावी लागते. तर ह्दविकार, अपघातात गंभीर जखमी यांनाही अधिक उपचारासाठी रत्नागिरी, कोल्हापूर वा मुंबईत जावे लागते. यासाठी प्रवासात जाणारा वेळ पाहिला तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. हे चित्र कधी बदलणार आहे की नाही असा जनतेचा सवाल आहे.
या मतदार संघाला विकासाची नवी दिशा देण्याचा संकल्प करून निवडूकीला सामोरे गेलेले व जनतेचा विश्वास संपादन करून निवडून आलेले आमदार किरण सामंत हे चित्र नक्कीच बदलतील अशी आशा तालुका वासीयांना आहे. राजापुर वासीयांना चांगल्या आरोग्य सेवेची नितांत आवश्यकता आहे. भविष्यात आ. सामंत यांनी यासाठी विशेष पुढाकार घेऊन राजापुर वासीयांचा हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला पाहिजे अशी राजापूर वासीयांची अपेक्षा आहे.












