खेड तालुक्यातील कर्टेल शाळेत शिवसेनेच्यावतीने खाऊ व शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम

खेड (प्रतिनिधी) –
खेड तालुक्यातील कर्टेल प्राथमिक शाळेत शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री श्री. रामदास कदम आणि शिवसेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख श्री. शशिकांत चव्हाण यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊ तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा प्रसंग पाहायला मिळाला. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे त्यांच्या शिक्षणात मदतीचा हात मिळाला. यावेळी पाटीलवाडी-कर्टेल परिसरातील पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

कार्यक्रमासाठी शिवसेनेचे तालुका व गाव पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेच्यावतीने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून भविष्यातही असे उपक्रम राबवले जातील, असे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना फळे, बिस्किटे, पेन, वही, दप्तर, पेन्सिल, रबरी आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमानंतर सर्वांनी रामदास कदम आणि शशिकांत चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

हा उपक्रम म्हणजे केवळ वाढदिवसाचा उत्सव नसून समाजप्रती असलेली बांधिलकी दर्शविणारा एक सकारात्मक संदेश आहे.