रामराजे महाविद्यालयात ‘रानमाया’ प्रदर्शन; जॅकफ्रूट किंग मिथिलेश देसाई प्रमुख पाहुणे

दापोली : रामराजे महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘रानमाया’ हे रानभाज्यांचे अनोखे आणि नाविन्यपूर्ण प्रदर्शन शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात कोकणातील पारंपरिक, दुर्मीळ आणि आरोग्यदायी रानभाज्यांपासून बनवलेल्या चविष्ट पाककृती सादर केल्या जाणार आहेत. भारंगी, टाकळा, कुर्डू, करटोली, चिचार्डी, चूच, प्याव, दार, मायाळू, तेरी, अळू, कोवळा बांबू, दिंडा, कुडा, आंबुशी, पाथरी, शेवगा, केना, पानांचा ओवा, कपाळफोडी, खापरफूटी, आघाडा, काटेमाट, चिवळ, घोळभाजी, आंबाडी, सुरण, उंबर अशा अनेक रानभाज्यांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे.

या उपक्रमाला ‘जॅकफ्रूट किंग’ म्हणून ओळखले जाणारे रत्नागिरीचे प्रगतशील युवा शेतकरी मिथिलेश देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

रानभाज्यांना पंचतारांकित चव देणाऱ्या या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, तसेच आरोग्यदायी व पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव घ्यावा, असे आवाहन रामराजे महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाने केले आहे.