निवेदिता प्रतिष्ठान तर्फे पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करणाऱ्या दापोली तालुक्यातील नागरिकांचे विशेष सन्मान

दापोली (विशेष प्रतिनिधी): पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करणाऱ्या दापोली तालुक्यातील जागरूक नागरिकांचा निवेदिता प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. हा गौरव सोहळा २६ सप्टेंबर २०२६ रोजी जालगाव येथील ‘आम्रपाली होम स्टे’ येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला*.
श्रीनिवास आखवे ,ज्येष्ठ पत्रकार जगदीश वामकर,अपर्णा पित्रे जोईस,कमल सकपाळ साळुंखे,कविता मोरे, विद्याधर ताम्हणकर, मयूर कावळे आणि शेतातील लाल मातीच्या गणेश मूर्ती तयार करणाऱ्या नवोदित मूर्तिकार वैद्य यांचा यथोचित सन्मान संस्थे तर्फे करण्यात आला.
सध्याच्या काळात सण-उत्सव साजरे करताना निसर्गाचा समतोल राखणे ही काळाची गरज बनली आहे. हीच गरज ओळखून दापोली तालुक्यातील काही भाविकांनी यंदा घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करताना घरगुती कृत्रिम टाक्यांचा वापर करून किंवा अन्य पर्यावरणपूरक मार्गांनी विसर्जन केले होते.
नदी, समुद्र आणि इतर नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी या नागरिकांनी उचललेल्या पावलाचे कौतुक करण्यासाठी निवेदिता प्रतिष्ठानने त्यांचा विशेष सन्मान केला.
याप्रसंगी निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत परांजपे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, “उत्सवाचा आनंद घेताना आपण निसर्गाचे देणे लागतो ही भावना जपणे महत्त्वाचे आहे. दापोलीतील नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जन करून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. या नागरिकांचा सन्मान करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत असून, भविष्यात ही चळवळ अधिक व्यापक होईल अशी आशा व्यक्त केली.”
या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सत्कारमूर्ती ज्येष्ठ पत्रकार जगदीश वामकर यांनी सर्व सत्कार मूर्तींच्या वतीने निवेदिता प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अशा प्रकारच्या प्रोत्साहनामुळे समाज अधिक जागरूक होतो आणि पुढील वर्षी आणखी मोठ्या संख्येने नागरिक या पर्यावरणपूरक मोहिमेत सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगीत विविधता प्रतिष्ठान संचालक अस्मिता परांजपे, शितल देवरुखकर, माहेश्वरी विचारे ,सुनील चव्हाण ,डॉ.अमित मिरगल, गायत्री अय्यर, अविनाश खुळे, अपर्णा पित्रे, विशाल बोरघरे,आशा फाटक, कमल सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.