सासऱ्याला मारहाणप्रकरणी जावयावर गुन्हा दाखल

संगमेश्वर : प्रतिनिधी

तालुक्यातील तुळसणी बौद्धवाडी येथे सासऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी जावईविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ जुलै २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

फिर्यादी रवींद्र पांडुरंग मोहिते (वय ५५, रा. तुळसणी बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नीने ग्रामीण कोठा बँकेतून १ लाख १४ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातील रक्कम अर्धी अर्धी त्यांच्या मुलगा रणजीत व मुलगी ज्योती यांना देण्यात आली होती. सदर कर्जाचा हप्ता मुलगा भरत होता, मात्र मुलगी हप्ता भरत नव्हती. त्यामुळे बँकेचे कर्मचारी वसुलीसाठी वारंवार येत होते.

या कारणावरून फिर्यादी मोहिते आणि त्यांचा पुतण्या सचिन कृष्णा कांबळे हे माहिती घेण्यासाठी २९ जुलै रोजी ज्योतीच्या घरी गेले होते. त्या वेळी संशयित आरोपी जगदीश अरविंद सुर्वे (वय ४२, रा. सुर्वेवाडी, ता. संगमेश्वर), जो फिर्यादीचा जावई आहे, याने रागाच्या भरात फिर्यादीस शिवीगाळ करत हाताच्या बोटांवर आणि डोक्यावर बांबूने मारहाण केली. यामुळे रवींद्र मोहिते हे गंभीर जखमी झाले.

फिर्यादीने या प्रकाराबाबत देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ३० जुलै २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजून २६ मिनिटांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.